Pimpri News : होर्डिंगधारकांनो, तीन दिवसात अनधिकृत होर्डिंग काढा, अन्यथा…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी जागेतील अनधिकृत होर्डिंग निष्काशीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. गेल्या आठवडयात संपूर्णत: अनधिकृत असलेले संपूर्ण शहरातून 28 होर्डिंग काढून टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडे अनधिकृत होर्डिंग नियमित करण्यासाठी आलेल्या अर्जांची स्थळ पाहणी व छानणी करून संदर्भीय सर्व अर्ज फेटाळण्यात आले असून त्यांना होर्डिंग काढण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तीन दिवसांच्या मुदतीने जर त्यांनी होर्डिंग काढले नाहीत. तर अशा अनधिकृत जागेवरील होर्डिंग महापालिकेकडून काढण्यात येतील. ते होर्डिंग काढण्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे होर्डिंगधारक व जागा मालकांनी होर्डिंग काढून टाकावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन बाहय जाहिरात धोरण विचाराधीन आहे. या धोरणाचा शहराच्या सौदर्यात समग्र विचार करण्यात आलेला आहे. या धोरणाला अनुसरुन महापालिका जागेतील 135 अनधिकृत होर्डिंग यापूर्वीच काढण्यात आलेले आहेत. तसेच, होर्डिंग नियमीत करण्यासाठी आलेले अर्ज व प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्यानंतर अर्जात नमूद आकारमान आणि प्रत्यक्ष उभे केलेले आकारमानात विसंगती दिसून आलेली आहे.

यामध्ये, पूर्वीचे नवीन परवानगीसाठी 117 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, प्रकटन नियमीत परवानगीसाठी 268 अर्ज प्राप्त झाले होते. फलक उभा करून बराच कालावधी झालेला आहे. या फलकापासून जागा मालक उत्पन्न मिळवत आहेत. त्यातून महापालिकेस कोणतेही शुल्क भरले जात नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.

होर्डिंगधारक / जागा मालकांकडून संदर्भीय तरतुदींचा भंग झाला आहे. त्याचबरोबर गतवर्षी सन 2021-22 मध्ये परवानगीसाठी अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी काही ठिकाणी विनापरवाना होर्डिंग उभा केल्याचे दिसून आलेले आहेत. असे होर्डिंग देखील महापालिकेकडून काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत होर्डिंगचे तीन वर्षाचे परवाना शुल्क हे दंड स्वरुपात वसूल करण्यात येणार आहेत.

जागा मालकांनी आपल्या मालकीचा जाहिरात फलक महापालिकेचे पत्र मिळालेल्या दिनांकापासून 3 दिवसाच्या आत स्वत:हून काढून टाकावा. अन्यथा आपला जाहिरात फलक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 या अधिनियमाच्या नियम 8 (ख) नुसार महापालिकेमार्फत आपल्या जोखमीवर काढण्यात येईल. सदर फलक काढण्याचा खर्च हा होर्डिंगधारक व जागा मालक यांच्याकडून महापालिका अधिनियम 439 मधील तरतुदीनुसार वसूल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ही वसूली महापालिकेच्या नियम 439 नुसार मालमत्ताप्रमाणे वसूल करण्यात येईल. तरी अशा अनधिकृत होर्डिंगधारकांनी आपले होर्डिंग काढून घ्यावेत, असेही आयुक्त पाटील यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.