PCMC : आयुक्तांसह तीन अधिकारी जाणार दुबई दौ-यावर

एमपीसी न्यूज – दुबईमध्ये विकसित करण्यात (PCMC) आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी रविवार (दि.15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि.20) पर्यंत असणार आहे. दरम्यान, या दौ-याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च 2022 रोजी पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे मागील 10 महिन्यांपासून अभ्यास दौरे बंद होते. आता प्रशासकीय राजवट असल्याने अधिका-यांचे दौरे सुरु झाल्याचे दिसते. दुबई दौ-यात आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी असणार आहेत. मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे.

सिटी सेंटरच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीसाठी देशपातळीवर निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही केवळ एकच निविदा प्राप्त झाली. अखेरीस ऍडव्हायझर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (केपीएमजी) या सल्लागार एजन्सीची तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी नियुक्ती केली आहे. या सल्लगार संस्थेला 12 महिन्यांसाठी 2 कोटी 9 लाख रुपयांचे शुल्क देण्यात आले आहे. महापालिकेने चिंचवड स्टेशन येथील डी मार्टजवळील 1 लाख 37 हजार 39.46 चौरस मीटर इतकी जागा पिंपरी – चिंचवड बिझनेस सेंटरसाठी आरक्षित केली आहे.

महापालिकेस भरीव स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी (PCMC) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर सिटी सेंटर बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत. नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्‍स, हुस्टन सिटी अमेरिका, दुबई धर्तीवर हे सेंटर उभारले जाणार आहे. दुबईमध्ये अत्याधुनिक पद्धतीने सिटी सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी दुबईतील सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Alandi : भोगी आणि मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आळंदीतील बाजारात महिलांची गर्दी

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांचा सहा दिवसांचा दौरा आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर ते नसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. कारण, यापूर्वीही आयुक्तांच्या अनुपस्थितीत जांभळे यांच्याकडेच पदभार दिला होता. त्यामुळे आता जांभळे यांच्याकडे पदभार दिला जातो की एखाद्या सनदी अधिका-याकडे दिला जातो, हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.