PCMC : सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – आम्ही शपथ घेतो की, आम्ही स्वत: स्वच्छतेच्या (PCMC) बाबतीत जागरूक राहू आणि स्वच्छतेसाठी वेळही देवू. आम्ही स्वत: घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम आम्ही स्वत: पासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्लीपासून, आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरूवात करू. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वत: घाण करीत नाहीत व घाण करू देत नाहीत.

या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मोहीमेचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल, अशी शपथ हजारो आरोग्य सेवकांनी घेऊन आरोग्य सफाई मित्र सुरक्षा शिबिरास सुरूवात करण्यात आली.

शहराला स्वच्छ, सुंदर ठेवण्यामध्ये सफाई मित्रांचे खुप मोठे योगदान आहे. पण हे कर्तव्य बजावत असताना बऱ्याचदा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. तसेच त्यांना दररोज कचरा गोळा करणे, साफसफाई करणे, इत्यादी कामे करावी लागतात त्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या परिवाराला विविध आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात.

ज्या सफाई मित्रांमुळे आपले शहर स्वच्छ राहते त्यांची व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य महत्वाचे आहे आणि यासाठीच सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी सफाई मित्रांनी घ्यावी, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

थेरगाव येथील दिवंगत शंकरराव गावडे कामगार भवन येथे ब, ड, ग, ह क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिरास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त (PCMC) यशवंत डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, कुंडलीक दरवडे, सतिश पाटील, महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.

‘स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0’ अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

Mahavitaran : वीज कंत्राटी कामगारांना 20 हजार रुपये पगारवाढ द्या; महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी

या अनुषंगाने ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ च्या दुसऱ्या भागामध्ये 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोजी महापालिका रुग्णालयांमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महानगरपालिका तसेच संस्थांचे सर्व स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

आज सुमारे 751 सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यातील 43 जणांची पुढील तपासणीसाठी रुग्णालयांसाठी शिफारस करण्यात आली. त्यामध्ये 26 कर्मचाऱ्यांना मधुमेहाची तर 17 कर्मचाऱ्यांना रक्तदाबाची लक्षणे आढळली आहेत.

दरम्यान, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता प्रभाग क्रमांक ९ मधील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, स्केटिंग ग्राऊंड, मासुळकर कॉलनी, अजमेरा येथे अ, क, इ, फ क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छता विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

शिबिराच्या सुरूवातीस महिला व पुरूष सफाई सेवकांचा अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिबिराचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, स्वच्छता शपथेचे वाचन आणि आभार प्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.