PCMC : मी आयुक्त कार्यालयातून बोलतोय…!

एमपीसी न्यूज – साईट व्हिजीटच्या नावाखाली (PCMC) अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नवीन फंडा सुरू केला आहे. दररोज सकाळी आयुक्त कार्यालयातून विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिका-यांना फोन केला जातो. मी आयुक्त कार्यालयातून बोलतोय… सर तुम्ही तुमच्या कार्यालयात पोहोचलात का ? असा प्रश्न विचारला जातो.

महापालिकेतील नगरसेवकांची 12 मार्च 2022 रोजी कार्यकाळ संपला. गेल्या वर्षभरापासून महापालिकेत आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय राजवटीत नगरसेवक, पदाधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना थम्ब नसल्याने साईट व्हिजीटच्या नावाखाली अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नाहीत. साहेबच नाहीत म्हटल्यावर विभागातील इतर कर्मचारीही जागेवर नसतात.

त्यामुळे प्रशासकीय कामकाजात गेल्या काही महिन्यांपासून बेशिस्तपणा वाढल्याचे वारंवार दिसून येत होते. अधिकारी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना भेटत नव्हते. नागरिकांची कामे होत नाहीत. हा सगळा सावळा गोंधळ समोर आल्यानंतर आयुक्त सिंह यांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

आता थेट विभागप्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांचीच आयुक्त कार्यालयातून दररोज दुरध्वनी करून हजेरी सुरू केली आहे. आयुक्त कार्यालयातून सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी यांच्या दालनातून दुरध्वनीव्दारे सर तुम्ही कार्यालयात पोहोचलात का? अशी विचारणा होऊ लागली आहे.

Chakan : चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होईना; अनुदानापासूनही वंचित राहण्याची शक्यता

त्यामुळे सर्वच विभाग प्रमुखांनी आयुक्त कार्यालयातून येणाऱ्या दुरध्वनीचा धसका घेतला असून कार्यालयात वेळेत उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आयुक्तांचा नवीन फंडा यशस्वी होताना (PCMC) दिसून येत आहे. मात्र, जास्त काम असल्यास काही विभाग प्रमुख उशिरापर्यंत महापालिकेत असतात. अदल्या दिवशी उशिरा थांबून काम करायचे आणि सकाळी लवकर यायचे, यावरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये याविषयी थोडी नाराजी असल्याची चर्चा पालिका वतुर्ळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.