PCMC : महापालिका विभागांमध्ये कागद विरहीत कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू

पाच प्रणालींचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अनावरण; 35 विभागाचा कारभार होणार ऑनलाईन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार आता ( PCMC ) कागदविरहीत (पेपरलेस) होणार असून प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. महापालिकेत जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीमुळे सर्व कारभार ऑनलाईन करण्यावर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी भर दिला असून, विवाह नोंदणी प्रणाली, प्रेक्षागृह, नाट्यगृहे बुकींग, ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, माहिती अधिकार प्रणाली, पशुवैद्यकीय व्यवस्थापन या विभागाच्या जीएसआय सक्षम ईआरपी  प्रणालीचे अनावरण मंगळवारी स्थायी समिती सभागृहात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ‍किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गंत महापालिकेच्या 35 विभागाचे दैनंदिन कामकाज कागदविरहीत सूरू होईल. या कार्य प्रणालीनुसार यापुढे महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज ऑनलाईन चालणार आहे. या कार्यप्रणालीमुळे महापालिकेतील सर्व विभाग ऑनलाईन जोडण्यात येत आहेत. तसेच या प्रणालीमुळे नागरी सेवा-सुविधा, सर्व फाईल्सचे कामकाज ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी – कर्मचा-यांचे श्रम वाचून व्यवहारात पारदर्शकता येणार असून फाईलला देखील दिरंगाई लागणार नाही.

Dadu Indurikar : वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सर्व नाट्यगृहाचे बुकींग, ग्रंथालये, पशुवैद्यकीय विभागातील श्वान परवाने, माहिती अधिकार अर्ज (आरटीआय), विविध विभागाचे कागदविरहित (पेपरलेस) ऑनलाईन कामकाज करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ विभागाचे कामकाज ऑनलाईन केलेले आहे. यापुढे अन्य उर्वरित विभागाचे कामकाज देखील ऑनलाईन करण्यात येणार आहे. जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीद्वारे नागरी सुविधा, सुरक्षा, ग्रंथालय, क्षेत्रीय कार्यालये, वैद्यकीय विभाग, भांडार विभाग यासह अन्य विभागाचे कामकाज ऑनलाईन होत आहे.

 

याद्वारे महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना आपल्या विभागातील सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. सर्व कार्यालये ऑनलाईन झाल्यास कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे ऑनलाईन पाहता येतील, त्यामुळे कागदविरहित (पेपरलेस) सर्व फाईल्सला देखील मान्यता देता येणार आहे.

विवाह नोंदणी झाली सोपी !

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता घरी बसून ऑनलाईन विवाह नोंदणी करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडून वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. मेसेज/ ई-मेलद्वारे राखीव तारीख व वेळेची सूचना, फोटो आणि बोटाचे ठसे घेण्याची सुविधा/ कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रमाणपत्रातील दुरुस्ती, विवाह संस्थांचे रजिस्ट्र्रेशन / संस्थांची पुर्ननोंदणी करता येणार आहे. यासह विवाह नोंदणीबाबतची माहिती संकलीत करण्यासाठी मनपा विभागास मदत होणार आहे.

पशुवैद्यकीय विभागाच्या सुविधाही ऑनलाईन!

ऑनलाईन प्रणालीद्वारे पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाईन केस पेपरची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट, रेबीज प्रतिबंध उपाय – पाळीव प्राण्यांसाठी लसीकरणाची नोंद कार्ड, पाळीव कुत्रे / मांजराचा परवाना, परवाना नूतनीकरण, मृत पाळीव प्राण्यांच्या दहणासाठी परवानगी, पाळीव प्राणी दत्तक घेण्याची प्रक्रीया सहज करण्यात येणार आहे. तसेच, मनपाच्या अखत्यारितील प्राणी संग्रहालयात प्राण्यांची माहिती (हिष्ट्री कार्ड, पोस्टमार्टम रिपोर्ट, प्राण्यांची गणना) जतन करण्यात येणार आहे. डॉग पार्क आणि पाळीव प्राण्यांची सदस्यत्वासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

माहिती अधिकाराची प्रक्रीय सुलभ!

माहिती अधिकार ऑनलाईन प्रक्रीयेत ऑनलाईन अर्ज करून माहिती मागविता येईल. विभागानुसार माहिती मागविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे ‍विभागांचा वेळ वाचणार आहे. ऑनलाईन प्रक्रीयेमुळे वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. समाधानकारक माहिती न मिळाल्यास अपिल करण्याची सूविधा देखील यामध्ये करण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्व विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे, नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने मनपा व स्मार्ट सिटी यांच्या वतीने जीआयएस सक्षण ईआरपी प्रणाली सुरु केली आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात येत आहे. यामुळे, संबंधित विभागातील अधिकारी – कर्मचारी यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. तसेच, कामकाजाला गती मिळणार आहे.

शेखर सिंह,  आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.