PCMC : …तर स्वच्छतेबाबतचे सर्वोच्च शिखर गाठणे सहज शक्य – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड (PCMC) शहराचा प्रवास उल्लेखनीय आहे. सफाई कर्मचा-यांचा यात सिंहाचा वाटा आहे. स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड शहर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत शहराला संपूर्ण देशात अव्वल आणण्याच्या मोहिमेला यशस्वी करून स्वच्छतेबाबतचे सर्वोच्च शिखर गाठणे सहज शक्य आहे, असे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत 4 ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके, ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे यांच्यासह फाउंडेशनचे प्रणव टोणपे व शाम राठोड, बेसिक्स, डिव्हाईन, बेसिक्स वेस्ट वेन्चर्स, ऑल इंडिया या माध्यम (PCMC) संस्थांचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Manobodh by Priya Shende Part 80 : मनोबोध भाग 80 – धरा श्रीधरा त्या हरा अंतराते

सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यावर काम सुरु आहे. पिंपरी- चिंचवड शहर देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये सफाई कर्मचारी तसेच शहरातील सर्वच घटकांचा सक्रीय सहभाग, योगदान आणि सहकार्य महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यादृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर करण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच येत्या काही दिवसांत सफाई कर्मचा-यांसाठी खेळांच्या स्पर्धा देखील घेण्याचा महापालिकेचा मानस आहे, असेही आयुक्त सिंह  यांनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमात ‘अ’ आणि ‘ब’ कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्वोत्तम कामगिरी करणा-या सफाई कर्मचाऱ्यांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. श्रावण कवडेकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगारभिमुख शिक्षण आणि कोर्सेसबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.