PCMC : अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) प्रमुख रस्त्यांवर, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवसायिक पत्राशेड आढळून येत आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यानंतर अतिक्रमणे होत असल्याने पालिकेने कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. आज (शनिवार) आणि उद्या (रविवारी) रोजी कुदळवाडीतील अतिक्रमणांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहरातील अनेक भागातील रस्त्यांलगत अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड धारकांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यावरच वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अडथळयांमुळे बऱ्याच वेळा लहान-मोठे अपघात घडलेले आहे. तसेच वाढत्या अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून बकालपणा वाढत आहे. रस्त्यांवरील आणि रस्त्यालगत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार पालिकेने अतिक्रमांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शनिवार (दि.17) आणि रविवार (दि.18) रोजी कुदळवाडीतील मोई फाटा रस्ता गट नं.13, चौधरी वजन काटा रस्ता, मोई फाटा ते चिखली प्रस्तावित 18 मीटर डीपी रोडवरील (PCMC) अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

PCMC : ‘त्या’ 12 अधिकाऱ्यांचा आयुक्तांकडे खुलासा सादर

…तर अधिकाऱ्यांवर कारवाई

कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून या भागात प्रथम कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. यासाठी बांधकाम परवानगी विभागातील (क, इ व फ) या क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी कारवाई करतेवेळी पूर्णवेळ उपस्थित राहावे. कारवाईला उपस्थित न राहिल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.