Pimple Gurav : ‘पाऊले चालती पंढरीची वाट’… कविता अन् अभंगरंगात रसिक झाले मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र, पिंपळे गुरव आणि भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे गुरव यांच्या वतीने पिंपळे गुरव महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणात कविसंमेलन अन् भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी नगरसेवक सागर आंगोळकर, महेश जगताप, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, बबन रावडे, मल्हार येळवे, जालिंदर दाते, माणिकराव नागपुरे, रमेश तांबे, मीनाक्षी खैरनार, मधुकर नवले, सुनंदा भोज, नागनाथ निळेकर, जनार्दन बोरोले, श्रीनिवास पानसरे, प्रकाश बंडेवार, ह.भ.प. मारुती जांभुळकर आदी उपस्थित होते.

  • तुळशीचे पूजन करून आणि “गणपती, गणराज धुंडीराज महाराज या समर्थ रामदास यांच्या पदाचे गायन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक, संगीतकार अक्षय लोणकर, तबलावादक यश कांबळे, हार्मोनियम माऊली इटकर अन् भक्तीरसपूर्ण निवेदन कवयित्री माधुरी ओक यांनी करून ज्येष्ठ नागरिकांना भक्तीसंगीताचा आस्वाद दिला.

“आपुल्या माहेरा जाईल मी आता” संत तुकारामांचा अभंग ऐकून रसिक तल्लीन झाले. ” सर्व सुखाचे ओतीले श्रीमुख,पाहू द्या रे मज विठोबाचे रूप ” संत नामदेवांच्या अभंगातून अक्षय लोणकर यांनी साक्षात विठुराया उभा केला. इंद्रायणी काठी.. कानडा राजा पंढरीचा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या भक्तीगीतांनी रसिकांची मने पंढरीच्या वारीत जाऊन पोहचली.

  • शाम सरकाळे यांची “चंद्रभागेला भेटाया चालली इंद्रायणी” अन् कवी सुरेश कंक यांच्या “तू फक्त एकदाच कृष्णार्पण म्हण” या कवितांना दाद मिळाली. ह.भ.प. शामराव झगडे अन् आत्माराम नवले यांनी ” भेटी लागी पंढरीनाथा” हा तुकोबारायांचा अभंग सादर केला.

निशिकांत गुमास्ते, मधुकर नवले, मीरा कंक, मुरलीधर दळवी, कालिंदी नवले, जयश्री गुमास्ते यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. “वैकुंठीचा राणा राया अगा विठ्ठल सखया” या भैरवीने या भक्ती संगीत मैफिलीची सांगता झाली. प्रास्ताविक प्रदीप बोरसे यांनी केले. सुरेश पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.