Pimpri: शहरातील 65 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत; 13 रुग्णांमध्ये लक्षणे तर दोन गंभीर 

Pimpri: 65 positive patients in the city have no symptoms; Symptoms in 13 patients and two Patients serious

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 226 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. महापालिका रुग्णालयात 91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी  65 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. पण, त्यांच्यात लक्षणे काहीच नाहीत. तर, 13 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर वायसीएमएच आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  यामध्ये पुण्यातील रहिवासी पण पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहराच्या नवीन भागात दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. जवळपास शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत शहरातील 226 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दीड महिन्याच्या बाळांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यात सर्वाधिक युवकांना लागण झाली. त्यामध्ये एक समाधानाची बाब म्हणजे रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आजपर्यंत 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका रुग्णालयात 91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 65 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. पण, त्यांच्यात लक्षणे काहीच नाहीत. या रुग्णांना बालेवाडीतील कोरोना केअर सेंटरमध्ये  देखरेखीखाली  ठेवण्यात आले आहे. 13 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर, कोरोना बाधित दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ”शहरातील 85 टक्के रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत.  पण,  त्यांच्यामध्ये लक्षणे काहीच नाहीत. 10 ते 15 टक्के नागरिकांमध्येच लक्षणे दिसतात. वयोमान, इतर आजार असणा-यांमध्ये अधिकची लक्षणे दिसून येतात. लहान बाळ, वयोवृद्ध यांच्या जीवाला धोका होवू शकतो. त्याचे प्रमाण 5 ते 10 टक्के आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोरोनाची लागणही होत नाही”.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील 93 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 34 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 26 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 22 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.