Pimpri: भटके श्वान, मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा; विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भटके श्वान, मोकाट डुक्करांची संख्या वाढली आहे. महापालिका त्यावर काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांना भटक्या श्वान व डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील भटके श्वान व डुकरे पकडण्याची मोहिम तीव्र करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरीया या सारख्या आजारांना पोषक वातावरण तयार होऊन या रोगांची वाढ होत आहे. या रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरीकांना महागडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत.

या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरे, दुकानाच्या आसपासच्या परीसाची तपासणी आरोग्य विभागामार्फत नियमितपणे होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यावर प्रतिधांत्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच डेंग्यू,चिकनगुनिया व मलेरीया या रोगाच्या प्रतिबंधक गोळ्या, लसी मनपाच्या दवाखान्यात पुरेश्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे औषधफवारणी, औष्णिक धुरफवारणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या रोग्यांची संख्या वाढत आहे. तसेच जंतूनाशक औषधेही वेळेवर उपलब्ध होत नसतात. त्यामुळे औषधफवारणी करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात औषध फवारणीची किती औषधे मागील सहा महिन्यात पुरविली व किती खरेदी केली आहेत, याची सविस्तर माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.