Pimpri : भाजपने नेमले विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी, संयोजक, सहसंयोजक

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी, संयोजक, सहसंयोजक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरु केल्या आहे. नुकतेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून 13 जण इच्छुक आहेत. मित्र पक्ष शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघातून भाजपचे 7 जण इच्छुक आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे, संयोजकपदी माजी नगरसेवक राजू दुर्गे तर सहसंयोजकपदी स्वीकृत नगरसेवक माउली थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी सरचिटणीस अमोल थोरात, संयोजकपदी स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे तर सहसंयोजकपदी शेखर चिंचवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी स्वीकृत नगरसेवक बाबू नायर यांची नियुक्ती केली आहे. तर, संयोजकपदी विजय फुगे आणि सहसंयोजकपदी पक्षाचे सरचिटणीस प्रमोद निसळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.