Pimpri: भाजपला डिसेंबर अखेर मिळणार नवीन शहराध्यक्ष; अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे यांचे नाव आघाडीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपला डिसेंबर अखेर नवीन शहराध्यक्ष मिळणार आहे. विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार असून हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात येणार आहेत. त्यानंतर शहराध्यक्षाचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. सचिन पटवर्धन आणि प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस उमा खापरे यांचे नाव आघाडीवर आहे.

विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जगताप यांना सुरूवातीच्या काळात जुन्यांच्या छुप्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत जगताप यांनी आपले काम सुरू ठेवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिकेवर पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलविण्यात भाजपला यश आले. मात्र, जुन्या-नव्यांमधील पक्षांतर्गत सुप्त संघर्ष आजही कायम आहे. अशा परिस्थितीत शहराध्यक्ष निवडताना पक्ष श्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.

राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस उमा खापरे यांच्या नावांची शहराध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून पटवर्धन ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे नाव पुढे आहे. शहरातील पदाधिका-यांकडून देखील त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

महिलेला संधी देण्याचा विचार झाल्यास प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस उमा खापरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महिला मोर्चा कोषाध्यक्ष, महिला मोर्चाच्या तिनदा सरचिटणीस तसेच शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे संघटनेतील कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या नावाचा देखील शहराध्यक्षपदासाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. विद्यमान शहराध्यक्ष देखील त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे समजते. माजी नगरसेवक राजु दुर्गे, सरचिटणीस अमोल थोरात देखील शहराध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत.

बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्षांची अगोदर निवड होईल. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नवीन शहराध्यक्ष निवडला जाईल. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात येण्याची शक्यता आहे. सर्वांची मते जाणून घेऊन नवीन शहराध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

राज्यातील सत्ता गेल्याने शहराध्यक्ष निवडीला विलंब
शहराध्यक्षांची डिसेंबरच्या पहिल्याच आठड्यात निवड होईल, असे सांगण्यात आले. राज्यात भाजपची सत्ता असताना शहराध्यक्ष पदासाठी मोठी चूरस होती. परंतु, राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे शहराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये चूरस राहिली नाही. निवड देखील लांबणीवर पडली. राज्यात सत्ता नसल्याने राज्यातून रसद मिळणार नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.