Pimpri Bribery case News : लाच प्रकरण! जनतेच्या पैशांवर डल्ला, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात लाच प्रकरणी स्थायी समिती अध्यक्षाला अटक होण्याची घटना कधी घडली नव्हती. परंतु, महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशा प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव असल्याची, कडवट टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच प्रकरणी 18 ऑगस्ट रोजी अटक झाली होती. एसीबीच्या पथकाने महापालिकेत धाड टाकत त्यांना अटक केली होती. यावर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची अद्यापपर्यंत प्रतिक्रिया आली नव्हती. चिंचवड येथील एका खासगी कार्यक्रमाला आज (शुक्रवारी) अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी लाच प्रकरणावर कडवट प्रतिक्रिया नोंदविली.  माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे यावेळी उपस्थित होते.

लाच प्रकरणात अडकलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा भाजपने अद्यापही राजीनामा घेतला नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, ”राजीनामा घ्यावा की, नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी 1991 पासून 2017 पर्यंत  20 वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत. जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक ‘अॅक्शन’ घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही. जनतेचे प्रतिनिधीत्व करत असताना जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव आहे”.

”लाच प्रकरणाच्या कारवाईचा तपास पोलिसांच्या पद्धतीने चालू आहे. या प्रकरणाचा अहवाल मागविण्याचा अधिकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आहे. आम्ही एकमेकांच्या खात्यामध्ये लुडबूड करत नाही. पुणे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सुविधा उपलब्ध करुन देणे आणि राजकीय हस्तक्षेप न होऊ देणे, काम करण्यासाठी त्यांना मोकळिक देणे. हे मी पाहतो. स्थायी समितीत कोणीही असले तरी चौकशी करणारी यंत्रणा त्यांचे काम करते. जोपर्यंत त्यात वस्तुस्थिती पुढे येत नाही. तोपर्यंत त्याबाबत अधिकचे भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण, त्यात जे कोणी दोषी असतील. ते जर उद्या राष्ट्रवादीशी संबंधित असतील. तर, राष्ट्रवादी त्यासंदर्भात निश्चितपणे योग्य ती कारवाई करेल”, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.