Pimpri-chinchwad : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्त भाविक भक्ती रसात तल्लीन

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवात किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि त्यांचे सहकारी यांनी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला.

हा कार्यक्रम चिंचवडगाव येथील बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण (Pimpri-chinchwad ) येथे मंगळवारी (दि.9) पार पडला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात

“राम हैं स्वामी, रहीम हैं स्वामी…” या स्तवनातून श्री स्वामी समर्थ आणि दत्त संप्रदायातील सत्पुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. “स्वामीराज माउली माझी…” , “भूवरी धन्य स्वामी अवतार…” अशा प्रत्येक भक्तिरचनांच्या प्रारंभी अन् शेवटी ‘महाराज श्री स्वामी समर्थ’ अथवा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ यासारख्या नामघोषांचा अंतर्भाव केल्याने नकळत भाविक श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरीत साथसंगत केली. “जीवनाची होडी…” आणि “स्वामी याहो भजनात…” या भक्तिगीतांना समरस झालेल्या भाविकांनी दाद दिली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने प्रमोद उर्फ राजग शिवथरे यांना रक्तदान या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव  (Pimpri-chinchwad ) पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मैफलीच्या उत्तररंगात “स्वामींच्या दरबारातून…” , “मन लागो रे लागो रे…” या गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वामी समर्थ यांचे शिष्य शंकर महाराज यांच्या लीला वर्णन करणाऱ्या गीतांमध्ये अजीज नाझा यांच्या आवाजातील “चढता सूरज…” या लोकप्रिय कव्वालीच्या शैलीत सादर झालेली “आज बाबा शंकरजी सामने हमारे हैं…” ही कव्वाली श्रोत्यांना विशेष भावली. रसिकाग्रहास्तव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…” हे भजन समरसून सादर करीत मुकुंद बादरायणी यांनी श्रोत्यांना पंडितजींच्या आवाजाची अनुभूती दिली.

 

मैफलीचा समारोप करताना त्यांनी “हम गया नही, जिंदा हैं…” हा स्वामींचा संदेश कव्वालीच्या माध्यमातून भाविकांना दिला. डॉ. लक्ष्मण अवधानी आणि ओंकार कुलकर्णी यांनी स्वरसाथ केली. सर्वेश बादरायणी (तबला), सुजीत लोहर (पखवाज), ज्योत्स्ना क्षीरसागर (संवादिनी), मकरंद बादरायणी (तालवाद्य) यांनी साथ संगत केली; तर स्वरदा बादरायणी यांनी मैफलीचे निवेदन केले.

 

उत्सवात पहाटे साडे चार वाजता श्रींचा सुगंधी द्रव्याने अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, महानैवेद्य आणि सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. सत्संग मंडळाचे सदस्य कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.