Pimpri Chinchwad RTO News : पिंपरी चिंचवड आरटीओमध्ये 32 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

एमपीसी न्यूज – मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे 9 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6वाजेपर्यंत ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. 
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 25 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
जाहीर ई-लिलावात एकूण 32 वाहने आहेत. यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.
जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 2 मार्च ते 6 मार्च या कालावधीत www.eauction.gov.in  या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.
ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर 2 मार्च ते 7 मार्च या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 प्रत्येक वाहनासाठी 50 हजार रकमेचा ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड’ या नावे अनामत रक्कमेच्या धनाकर्षासह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी, मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम 25 फेब्रुवारीपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=X7gPB9iCIVs

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.