Pimpri News: शहरात डिसेंबरमध्ये राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन – प्रा. उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मुंबईच्या धर्तीवर इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. तर, शहरात 11 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धा घेण्याचे नियोजन असल्याचे क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची बैठक नुकतीच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली. याप्रसंगी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकत्याच क्रीडा विभागाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.यामध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा व खेळाडू घडवण्यासाठी मगर स्टेडियम येथे स्वतंत्र क्रीडा विभाग कार्यालय बांधण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार (खेळाडू ,दिव्यांग खेळाडू व मार्गदर्शक) 2021 क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार करण्यात आला. त्यामुळे देशातील राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळाडू असो त्याला महापालिकेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे.

कबड्डी व्यवसायिक संघ (महिला व पुरुष) तयार करण्याचे धोरण कार्यान्वित करण्यात येणार आहे. ठाणे येथील अभ्यासिकेचा अभ्यास करून व पाहणी अहवाल बघून स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे धोरण तयार करून त्याचा अंतर्भाव क्रीडा विभागामध्ये मध्ये करण्यात येणार आहे. व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर देण्याऐवजी व्यायाम शुल्क दरात वाढ करून व्यायामशाळा पाच वर्षे भाडे कराराने चालविण्यास देण्यासाठी सीटीओ कार्यालयाच्या सहकार्याने धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती प्रा. केंदळे यांनी दिली.

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन 11 ते 22 डिसेंबर 21 या दहा दिवसाच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. येणाऱ्या सहा महिन्यात मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये देशातील 30 संघ सहभागी होणार आहेत.

जलतरण तलाव चालू व अद्यावत करण्यात येणार आहेत. दोन वर्षापासून स्पर्धा झालेल्या नाहीत. त्यामुळे दोन महिन्यात महापौर चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या खेळ सुविधा कार्यक्षमतेने चालू करून खेळाडू तयार करण्यात येणार आहेत. संगीत अकादमी मार्फत आमंत्रित करण्यात येणार्‍या नामांकित कलाकारांच्या मानधनात वाढ करून प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचे सभापती प्रा. केंदळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.