Pimpri Corona Update : चिंताजनक ! आज 98 मृत्यू; 2 हजार 17 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येतील वाढ कायम आहे. काही केल्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला 90 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. आज (बुधवारी) 98 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महापालिकेने दिली. तर, शहराच्या विविध भागातील 1 हजार 956 आणि महापालिका हद्दीबाहेरील 61 अशा 2 हजार 17 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

शहरातील 55 आणि महापालिका हद्दीबाहेरील 43 अशा 98 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 69 पुरुष आणि 29 महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील चोवीस तासात 19 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात आजपर्यंत 2 लाख 5 हजार 901 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 80 हजार 869 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2831 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1337 अशा 4 हजार 168 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 8 हजार 661 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2 हजार 291 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 84 हजार 60 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.