Pimpri: पालिकेतील शिक्षण विभागातील ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी

विरोधी पक्षनेत्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा सुरु होऊन तीन महिने झाले. परंतु, अजूनही काही शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करत शिक्षण विभागातील ठेकेदाराची सखोल चौकशी करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच शिक्षण विभागामध्ये ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शिक्षण विभागातील वह्या व बूट पुरविणारा ठेकेदार गेली 15 ते 20 वर्षांपासून शिक्षण विभागात शालेय साहित्य पुरविण्याचे काम करीत आहे. नातेवाईकांच्या नावांवर वेगवेगळ्या नांवानी शिक्षण विभागातील ठेके गेल्या पंधरा वर्षापासून घेत आहे. शालेय सत्र सुरु होऊन आज तीन महिने झाले झाले. परंतु, अद्यापपर्यंत काही शाळांना वह्या पुरविल्या गेल्या नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या संबधित ठेकेदारांची मागील 15 वर्षाच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी आढल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे.

शिक्षण विभागामध्ये या ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. नगरसेवकाने शिक्षण विभागातील गैरव्यवहाराविषयी माहिती मागवली असता ती देऊ नये म्हणून संबंधित लिपिकांवर या ठेकेदाराने दबाब आणला होता. परंतु, या दबावाला न घाबरता या प्रकरणाची सर्व माहिती लिपिकाने दिली असता त्या लिपिकाची बदली 25 लाख रुपये देऊन केली आहे.

चांगले काम करणा-या लिपिकाची आयुक्त ठेकेदारांच्या सांगण्यानुसार बदली करतात. त्यामुळे प्रशासन ठेकेदार चालवत असल्याचे स्पष्ट होते. तसेच 25 लाख घेतलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याचा अहवाल प्रसिध्द करण्यात यावा. दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही साने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.