Pimpri: पास असेल तरच शहरात प्रवेश; 14 दिवस ‘होम ‘क्वारंटाईन बंधनकारक – श्रावण हर्डीकर

Entry into the city only if there is a pass; 14 days 'Home' quarantine is mandatory - Shravan Hardikar

एमपीसी न्यूज – राज्याच्या विविध भागातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-यांना पास असेल तरच प्रवेश दिला जातो. शहरात वास्तव्यासाठी आलेल्यांची पोलिसांकडून माहिती  घेतली जाते. त्यांच्या हातावर 14 दिवस ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारुन त्यांना क्वारंटाईन केले जाते.  बाहेरुन आलेल्यांनी होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

तसेच परवानगी न घेता आलेल्यांनी महापालिकेला माहिती कळवावी. स्वत:हून होम क्वारंटाईन व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

देशभरात लॉकडाउनचे चार टप्पे संपले. त्यानंतर 1 जूनपासून अनलॉक-1 सुरु झाला आहे. हा अनलॉक 30 जूनपर्यंत असणार आहे. यामध्ये केंद्र सरकारने विविध सवलती दिल्या होत्या. पण, राज्य सरकारने दक्षता घेत बहुतांश सुविधांमध्ये सवलत दिल्या नाहीत. त्यामध्ये पास असल्याशिवाय प्रवासाला परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे पास काढूनच प्रवास करणे आवश्यक आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राहणारे नागरिक आपल्या मूळगावी गेले होते. त्या नागरिकांनी परत शहरात येताना पास घेऊनच येणे आवश्यक आहे. पास असल्याशिवाय शहरात प्रवेश दिला जाणार नाही.

पास घेऊन दररोज शहरात आलेल्या नागरिकांची माहिती महापालिका पोलिसांकडून घेते. त्यानुसार या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानुसार त्यांनी 14 दिवस क्वारंटाईन राहणे  बंधनकारक आहे.

जे नागरिक परवानगी न घेता, इतर मार्गांनी शहरात येत आहेत. ते नागरिक सारथी हेल्पलाईनवर शहरात आल्याची माहिती देतात. त्यानुसार त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन क्वारंटाईन केले जाते. तसेच जे नागरिक माहिती देत नाहीत. त्यांनी माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

परदेशातून विमानाने शहरात आलेल्या नागरिकांना संस्थात्मत विलगीकरण केले जाते. तर, शहरात काही कामानिमित्त एकादिवसासाठी येवून गेलेल्या नागरिकाला क्वारंटाईन केले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील नागरिकांना शहरात नो-एंट्री !

पुण्यातील अनेक लोक कामासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येत असतात. परंतु, पुण्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश दिला जात नाही. पुण्यातील नागरिकांना शहरात येवू देण्याची मागणी होत आहे. परंतु, पुण्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने पुण्यातील नागरिकांना पिंपरी शहरात येण्यास बंदी कायम  असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.