Pimpri: आनंदाची बातमी ! ३ ‘कोरोनामुक्त’; तर आणखी तिघांचे पहिले रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

तिघांना डिस्चार्च; आजपर्यंत 24 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिका रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन ३ जण कोरोनामुक्त होत ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय आणखी तिघांचे 14 दिवसांच्या उपचारानंतरचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. आजपर्यंत 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, एका रुग्णाचे 14 दिवसानंतरच्या उपचारानंतरचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी महापालिका प्रशासनाने 14 दिवसांच्या उपचारानंतर तिघांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यानंतरच्या 24 तासाचे देखील रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे ३ जण कोरोनामुक्त होत ठणठणीत बरे झाले आहेत. यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 61 वरुन कमी होऊन 58 वर आली आहे. याशिवाय आणखी तिघांचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 24 तासानंतरचे त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.

त्यांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर या तिघांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे. तर, एका रुग्णाने 14 दिवसाचे उपचार घेतल्यानंतरही त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यापुर्वी देखील एका बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. यामुळे प्रशासनाची चिंता मात्र वाढली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 81 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 58 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 46 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24) निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.