Pimpri: दापोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत करा; आमदार अण्णा बनसोडे यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांच्याही कुटुंबियांना तात्काळ दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच या कामात हलगर्जीपणा करणा-या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दापोडी येथे पाईपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात मजूर नादप्पा जमादार पडले. त्यांना वाचविण्यासाठी खड्डयात उतरलेले महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव यांनी प्रयत्न केला. या घटनेत मजूर जमादार व कर्तव्य बजावत असताना विशाल जाधव यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

मयत जमादार आणि जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना महापालिकेने तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपये द्यावेत. तसेच त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नोकरीस घ्यावे. अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी शहरात सुरु असणा-या विकास प्रकल्पांच्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असेही बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.