Pimpri : तिघांना गुंगीचे औषध देऊन नोकर दाम्पत्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – आई, वडील आणि मुलाला जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही गुंगी येऊन झोपल्यानंतर नेपाळी नोकर दाम्पत्याने घरातील कपाटातून सात ते आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) दुपारी महेशनगर पिंपरी येथे घडला.

काशिनाथ महादू नेरकर (वय 77, रा. महेशनगर, पिंपरी), सुमनबाई काशिनाथ नेरकर (वय 67), ग्रुप कॅप्टन दीपक काशिनाथ नेरकर (वय 49) अशी गुंगीचे औषध दिलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी दीपक यांच्या मुलीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिस उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ नेरकर यांचा समीर हा मुलगा एअरफोर्स मध्ये असताना शहीद झाला आहे. त्यांच्या नावाने काही वर्षांपूर्वी महेशनगर पिंपरी येथे समीर हा बंगला बांधण्यात आला आहे.

काशिनाथ नेरकर हे हिंदुस्थान अँटिबायटिक्स कंपनीतून निवृत्त झाले आहेत. तर दीपक हे स्टडी लिव्ह वर पुण्यात आले आहेत. ‘समीर’ या बंगल्याची रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम सुरू आहे. आरोपी नेपाळी दाम्पत्य मागील महिन्यात 28 तारखेला बंगल्यात घरकामासाठी राहायला आले. घरातील स्वयंपाक आणि अन्य काम हे दाम्पत्य करीत होते.

_MPC_DIR_MPU_II
  • बंगल्यात रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने दीपक यांच्या दोन मुली कोथरुड येथील घरी होत्या. दीपक यांच्या पत्नी अर्चना मुलींना आणण्यासाठी मंगळवारी सकाळी कोथरुड येथे गेल्या. अर्चना व मुली मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता घरी आल्या. तेंव्हा काशिनाथ नेरकर त्यांची पत्नी सुमनबाई व दीपक हे झोपलेले होते. दुपारी अर्चना यांनी घराची कडी वाजवली, त्यावेळी दीपक यांनी झोपेतच येऊन उघडली आणि परत झोपी गेले. अनेक दिवसांचे काम सुरू असल्याने दमून झोपले‌ असतील, असे समजून दीपक यांच्या पत्नी अर्चना आणि मुलींनी त्यांना उठवले नाही. तसेच या तिघी देखील झोपल्या.

पाच वाजता अर्चना व मुली झोपेतून उठल्या. चहा करण्यासाठी नेपाळी महिलेला बोलविण्यासाठी गेल्या. तेव्हा आऊट हाऊस बंद दिसले. त्यानंतर सात वाजले तरी दीपक आणि सासू सासरे उठत नाही, म्हणून अर्चना यांनी प्रथम पती दीपक यांना उठवले. तेव्हा दीपक यांनी डोके गरगरत असल्याचे सांगितले. तसेच सुमनबाई आणि काशिनाथ हे उठत नव्हते. सुमनबाई या स्वच्छता गृहात जाताना पडल्या.

  • अर्चना यांनी घरातील कपाटात बघितले असता ते अस्ताव्यस्त उचकलेले दिसले. घरकाम करणारे नेपाळी दाम्पत्य देखील घरात नसल्याचे तसेच कपाट आणि बंगल्याचे मागील दार उघडे असल्याचे अर्चना यांच्या लक्षात आले. दागिने आणि पैसे कपाटात नसल्याचे तसेच पती, सासू सासरे यांना खाण्यातून काहीतरी घातल्याने समजल्याने अर्चना यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली.

पोलिसांनी तत्काळ नेरकर यांच्या घरी धाव घेतली. तिघांना सुरवातीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून तिघांना कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. दीपक यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या आई वडिलांवर कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिस आणि गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.