Pimpri: मतदान ओळखपत्र नसेल तर, ‘हे’ पुरावे दाखवूनही करता येणार मतदान

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज दाखवून मतदान करता येणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, यंदा मतदार स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही.

मतदार यादीत नाव आणि वैध मतदार ओळखपत्र असलेल्या व्यक्तींना आपला लोकशाही हक्क बजावता येईल. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी बॅनर, सोशल मीडिया आदी माध्यमांतून आवाहन केले जात आहे.

मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेले फोटो ओळखपत्र (इपीआयसी) मतदान केंद्रावर सोबत आणावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. जे मतदार फोटो ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत त्यांनी खाली नमूद केलेले पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत घेऊन यावा, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी सांगितले आहे.

‘हे’ पुरावे ग्राह्य!
पासपोर्ट, वाहन परवाना, राज्य व केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिसमार्फत दिलेले स्मार्टकार्ड, पॅनकार्ड, आरजीआय/एनपीआरमार्फत दिलेले स्मार्टकार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा जॉबकार्ड), कामगार मंत्रालय अंतर्गत स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड, फोटोयुक्त पेंशन दस्ताऐवज, खासदार, आमदार/विधानपरीषद सदस्य यांना दिलेले कार्यालयील ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.