Pimpri : आमदार चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले फ्लेक्स बेकायदेशीर; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्स लावले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र महापालिका अधिनियमासह मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी फिर्याद दिली आहे.

नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू किंमतराम आसवानी (वय 51, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, किशोर केसवाणी (रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी आरोपी किशोर यांनी शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि किशोर केसवाणी यांना शिवसेना व्यापारी सेल, पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फ्लेक्स लावले. या फ्लेक्ससाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. पिंपरी कॅम्प परिसरातील वैष्णोदेवी चौक आणि इतर परिसरात हे फ्लेक्स लावले.

जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 284, 245 आणि मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.