Pimpri News: जम्बो रूग्णालयासाठी 10 कोटीचा खर्च ‘पीएमआरडीए’कडे वर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरीतील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल मैदानातील जम्बो रूग्णालयासाठी महापालिकेने 10 कोटी रुपयांचा खर्च ‘पीएमआरडीए’कडे वर्ग केला आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान आणि पिंपरीतील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल मैदानात जम्बो रूग्णालय उभारण्यात आले.

या कामाकरिता इन्फ्रास्ट्रक्चर मेडीकल इक्वीपमेंट आणि मेडीकल सेवा ऑपरेटरसाठी 60 ते 70 कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे पीएमआरडीएने 6 ऑगस्ट 2020 रोजी कळविले होते. त्या अनुषंगाने पीएमआरडीएने अतिरिक्त 15 कोटीची मागणी केली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेच्या ठरावानुसार पीएमआरडीएला 25 कोटीपैकी 10 कोटी रूपये देण्याबाबत विषय मंजुर झाला. त्यानुसार, या कामासाठी 10 कोटी 24 ऑगस्ट रोजी पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात आले.

मध्यवर्ती भांडार विभागाकडील ‘कोरोना निधी’ या लेखाशिर्षातून हा निधी पीएमआरडीए यांना देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.