Pimpri News: पाण्याची लाईन, 9 पाणी टाक्या अन् 1 पंप हाऊस उभारणार, 64 कोटीच्या खर्चाला स्थायीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – वाकड, थेरगाव, सेक्टर 7,10 आणि भोसरीत पाण्याची मुख्य नलिका टाकण्यात येणार आहे. शहरात 9 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) उभारण्यात येणार आहेत. याशिवाय 1 पंप हाऊस उभारण्यात येणार असून त्यासाठी येणा-या 64 कोटी 19 लाखाच्या खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पॅकेज तीन अंतर्गत वाकड, थेरगाव, सेक्टर 7,10 आणि भोसरीत पाण्याची मुख्य नलिका टाकणे, शहराच्या विविध भागातील 9 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) उभारणे आणि 1 पंप हाऊस उभारुन कार्यान्वित करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा रक्कम 64 कोटी 65 लाख 82 हजार रुपये इतकी होती. निविदा प्रक्रियेत 6 ठेकेदारांनी सहभाग घेतला.

त्यापैकी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 0.99 टक्के कमी दराने निविदा आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची आणि ठेकेदार 24 महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी 6 जानेवारी 2022 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेसह 64 कोटी 19 लाख रुपयात ठेकेदाराकडून काम करुन घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

या 9 ठिकाणी उभारणार पाण्याच्या टाक्या!
थेरगाव (3 द.ल.लीटर), लक्ष्मणनगर (2.5 द.ल.लीटर) न्यू संत तुकारामनगर ( 2 द.ल.लीटर), बो-हाडेवाडी (2.5द.ल.लीटर), चिखली एमबीआर (3 द.ल.लीटर), सावित्रीबाई फुले उद्यान ( 3द.ल.लीटर), सेक्टर 12 (1.5 द.ल.लीटर), आश्रम शाळा ( 2 द.ल.लीटर) आणि भोसरी भाजी मंडई (2. दक्षलक्ष लीटर ) क्षमतेच्या पाणी टाक्या उभारण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर 21.5 दक्षलक्ष लीटर क्षमतेने पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर, 13.8 किलो मीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. 1100 मि.मी व्यासाची माइल्ड स्टीलची 6 किमी लाईन चिखली जलशुद्धीकरण ते सेक्टर 7-10 पर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

मोशीत वितरण नलिका
मोशीत 7 किलो मीटर अंतरावर वितरण नलिका टाकण्यात येणार आहे. आरटीओ शेजारील नवीन पाण्याच्या टाक्यामधून मोशी भागाला जास्त पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. इतर भागातील नवीन बांधण्यात येणा-या पाण्याच्या टाक्यांना जोडण्यासाठी व त्या भागातील पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी वितरण नलिका टाकण्यात येणार आहे. 2 हजार वाढीव लोकसंख्येला नवीन नळजोड या नलिकेवर देता येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.