Pimpri News: शहरात 8 अनधिकृत शाळा, महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रात शासनाची कोणतीही परवानगी न घेता 8 शाळा अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. या शाळांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

शासनाच्या मान्यतेने खासगी अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित सर्व माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. परंतु, काही शाळा या शासनाची मान्यता न घेता अनाधिकृतरित्या चालविल्या जातात. सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात महापालिका कार्यक्षेत्रातील विभागीय पर्यवेक्षकांमार्फत शाळांची तपासणी केली. त्यात 8 खासगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले.

कासारवाडीतील मराठी माध्यमाची ज्ञानराज प्राथमिक शाळा,  रहाटणीतील इंग्रजी माध्यमाचे मॉर्डन पल्बिक स्कुल, भोसरीतील मास्टर केअर इंग्लिश स्कुल, चिखलीतील ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कुल, सांगवीतील एम.एस. स्कुल फॉर किड्स, पिंपळेसौदागर येथील साई स्कुल ऑफ एक्सलेन्स, चिखलीतील सेंट रोझरी इंग्लिशम मिडीयम स्कुल आणि रहाटणी, काळेवाडातील माने इंग्लिश स्कुल या 8  या शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत.  या शाळांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

 

या सर्व शाळा व्यवस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. महापालिका  प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी ही माहिती दिली. महापालिका क्षेत्रातील संबंधित पालकांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.