Pimpri News : ‘नगरसेविका अर्चना बारणे यांचा मृत्यू डेंग्यूमुळे की चुकीच्या उपचारामुळे ?’

नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर

एमपीसी न्यूज – भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे खासगी हॉस्पिटलने सांगितले. तर, महापालिकेकडून डेंग्यूमुळे मृत्यू झाले नसल्याचे सांगितले जाते. मग, नेमका कशाने मृत्यू झाला. त्यांना खरच डेंग्यूची लागण झाली होती की त्यांच्यावर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला? अशी शंका उपस्थित करत नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली.

शहरामध्ये डेंग्यू पसरला आहे, मात्र ते लपविण्यासाठी प्रशासन वेगवेगळी कारणे सांगत असून त्यांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. त्यावर महापौरांनी याबाबत सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) महापौर कक्षातून ऑनलाइन आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेसाठी पदाधिकारी, गटनेते त्यांच्या केबिनमधून, काही नगरसेवक सभागृहनेत्याच्या दालनातून तर, काही नगरसेवक आपल्या घरुन ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ‘ व्दारे सभेत सहभागी झाले होते. 55 नगरसेवकांनी सभेत सहभाग घेतला.

भाजपच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे 13 जुलै रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. खासगी हॉस्पिटलने डेंग्यूमुळे निधन झाल्याचे सांगितले. तर, महापालिकेकडून डेग्यूमुळे निधन झाले नसल्याचे सांगितले जाते. यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेविका बारणे यांना श्रद्धांजली वाहून आजची महासभा 29 जुलै दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. नगरसेवकांनी अर्चना बारणे यांच्यावविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या अकाली निधनाने सभागृहात पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला. त्यांना खरच डेंग्यूची लागण झाली होती का, की त्यांच्यावर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला याची चौकशी होणे आवश्‍यक आहे. त्यांचा रक्तगट ‘ए’ पॉझिटिव्ह असताना त्यांना ‘बी’ निगेटिव्ह प्लेटलेटस दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

माजी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”चुकीच्या प्रकारे रुग्णांवर उपचार होत असतील. तर, ते गंभीर आहे. याची चौकशी होणे आवश्‍यक आहे”. माजी महापौर राहूल जाधव म्हणाले, ”समाजात काम करत असताना अनेक नगरसेवक आपला जीव धोक्‍यात घालतात. प्रसंगी आपल्या प्रकृतीची काळजी घेत नाही. आतापर्यंत आपले चार नगरसेवक आपल्याला सोडून गेले आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत असा हलगर्जीपणा होत असेल. तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय घडत असेल. यासाठी त्वरित एक वैद्यकीय समिती नेमून त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी”.

अर्चना बारणे यांना भरती केलेले खासगी हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. एकीकडे खासगी लॅबमध्ये त्यांना डेंग्यू असल्याचे निदान केले जाते. तर, दुसरीकडे आपल्या वायसीएम रुग्णालयातून त्यांना डेंग्यू नसल्याचा अहवाल देण्यात येतो. मग, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, असा सवाल भाजपच्या अभिषेक बारणे यांनी उपस्थित केला.

याबाबत खुलासा करताना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे खासगी हॉस्पिटलने म्हटले आहे. पण, वायसीएम रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत त्यांना डेंग्यू झाला नसल्याचे निदान झाले. याची चौकशी करण्यासाठी दोन डॉक्‍टरांची समिती नेमली आहे. तपास चालू आहे.

दरम्यान, त्यांच्या खुलाशावर नगरसेवकांचे समाधन झाले नाही. शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असून ते लपविण्यासाठी प्रशासन पळवाट काढत आहे. या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अर्चना बारणे यांच्या मृत्यूने दुहेरी शंका निर्माण झाली आहे. एवढ्या कमी कालावधीत कसा मृत्यू होऊ शकतो हा प्रश्‍न आहे. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करून त्वरित त्याचा अहवाल सादर करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.