Pimpri News: शिक्षण विभागासाठी टॅब खरेदीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ऑफलाइन पद्धतीने चालू असताना कोट्यावधी रुपये खर्चून टॅब खरेदी करण्याचा घाट घातला आहे. 40 कोटीच्या टॅब खरेदी प्रस्तावाला जागृत नागरिक महासंघाचा तीव्र विरोध आहे.टॅब खरेदीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी संघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात यादव यांनी म्हटले आहे की, मार्च 2020 पासून कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला वेढलेले होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या महाराष्ट्रासह देशातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. सर्व शाळा जवळपास अठरा महिने बंद होत्या याला अशावेळी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासन आदेशानुसार सर्व शाळा व्यवस्थापकांनी ऑनलाइन शिक्षण चालू ठेवले होते.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना या महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा पुन्हा पूर्वीसारखेच सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 1 डिसेंबर 2021 पासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुद्धा सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत.
महापालिका शिक्षण विभागाने माध्यमिक मधील विद्यार्थ्यांसाठी 19 हजार टॅब व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 8 हजार टॅब असा एकूण 27 हजार रुपयांचा टॅब खरेदीसाठीचा प्रस्ताव भांडार विभागाकडे पाठवलेला आहे. यासाठी अंदाजे रुपये 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

कोरोना कालावधीमध्ये जेव्हा महापालिकेच्या सर्व प्रकारच्या शाळा ऑनलाइन पद्धतीने चालू होत्या. त्यावेळी गोरगरीब विद्यार्थ्यांकडे टॅब अथवा तत्सम शिक्षण सामग्री नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्या काळात महापालिकेने विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले असते तर ती बाब वास्तव आणि संयुक्तिक होती. तथापि, सध्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ऑफलाइन पद्धतीने चालू असताना कोट्यावधी रुपये खर्चून टॅब खरेदी करण्याचा घाट घातला आहे.सध्या सर्व शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू असताना या टॅबचा विद्यार्थ्यांना काहीएक उपयोग होणार नाही अशा परिस्थितीत टॅब खरेदी करून महापालिकेला काय साध्य करायचे आहे? टॅब खरेदीला आमचा तीव्र विरोध आहे. ही टॅब खरेदी म्हणजे नागरिकांच्या कष्टयाच्या व घामाच्या कररुपी पैशाची सरळ सरळ लूट व उधळपट्टी आहे आणि ही लूट आम्ही होऊ देणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

जागृत नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, सचिव उमेश सणस, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, सातारा विभाग प्रमुख प्रकाश पाटील, सदस्य प्रकाश गडवे, सदस्य दीपक नाईक आणि मगदूम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.