Maharashtra corona News: महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा वाढवा

खासदार बारणे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मोठे राज्य असल्याने रुग्णसंख्या देखील जास्त आहे. या महामारीला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसीचे जास्तीचे डोस उपलब्ध करून द्यावेत. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही कोटाही वाढवून देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोनाने महामारीने गंभीर स्वरूप घेतले आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वाधिक बाधित आहे. या आजारातून वाचवण्यासाठी लसीकरण एकमात्र उपाय आहे. परंतु, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मागणीनुसार आवश्यक तेवढे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस वेळेवर मिळत नाही. लसीचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना केंद्रांवरून परत जावे लागत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठा तुटवडा जाणवत आहे. इंजेक्शन अभावी काही जणांच्या मृत्यूही झाला आहे.

त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही कोटा वाढवून द्यावा. महाराष्ट्र लोकसंख्येने दुसरे मोठे राज्य आहे. मोठे राज्य असल्याने कोरोनाचे रुग्णही जास्त आहेत. अशा परिस्थितीत महामारीविरोधात लढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयाकडे लक्ष केंद्रित नसले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसीचे जास्तीचे डोस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा वाढवून देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.