Pimpri news: स्मार्ट सिटीतील 520 कोटींच्या कंत्राटाची चौकशी सुरू; नगरविकास मंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनि:स्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या 520 कोटी रुपयांच्या कंत्राटात 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर शिवसेनेने केला आहे. त्याची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश प्रधान सचिवांना (दोन) दिले आहेत. तसेच त्याचा अहवाल देखील मागविला आहे.

शिवसेना पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीने आज (मंगळवारी) चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत या कंत्राटातील गोलमालाचा भांडाभोड केला.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, मॅचिंद्र देशमुख, अनिता तुतारे, आदिक भोसले, हरेश नखाते, अमोल निकम, विवेक तितरमारे, ज्ञानेश्वर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

योगेश बाबर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनि:स्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या कामाची 520 कोटी रुपयांची निविदा 9 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. टेक महिंद्रा कंपनी लिमिटेड, क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि आरसीअस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना एकत्रितपणे हे 520 कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले”.

”प्रत्यक्षात हे काम केवळ 150 ते 200 कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे या निविदेत सुमारे 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यात भाजपचे उच्चपदस्थ नेते, शहरातील आमदार, स्मार्ट सिटीचे संचालक आणि भाजप, संघधार्जिणे पालिका आयुक्त यांची मिलिभगत आहे. हे संगनमताने लूट करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

गौतम चाबुकस्वार म्हणाले, ”स्मार्ट सिटीत बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले जातात. तथापि, राज्यात सत्तांतर झाल्याने आम्ही आता नगरविकास खात्याकडे दाद मागता आहोत. याबाबत यशस्वी पाठपुरावा करत आहोत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत. त्यामुळे ते आम्हाला न्याय देतील. आरोपांची वस्तुनिष्ठपणे चौकशी करतील. याची आम्हाला खात्री आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.