Pimpri News:  ड्रेनेज विभागातील चुकीच्या निविदाप्रक्रियेची चौकशी; 122 कोटींच्या कामातील भाजपचा लुटीचा डाव हाणून पडणार – संजोग वाघेरे‌

एमपीसी न्यूज – अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतनिधीतून महापालिकेने ड्रेनेज विभागातील सुधारणेसाठी 148 कोटींचे काम काढले. गेल्या पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अपारदर्शी कारभारामुळे अमृत योजनेतील हे काम बारगळले. त्यामुळे पुन्हा याच कामासाठी आणखी 122 कोटी रुपयांची निविदा काढून भाजपने सत्तेतून पायउतार होताना ते मंजूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने या कामातील त्रृटी निदर्शनास आणून दिल्यामुळे चुकीच्या निविदाप्रक्रियेची चौकशी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी सांगितले आहे. यामुळे 122 कोटींच्या कामातील भाजपचा लुटीचा डाव हाणून पडणार असल्याचेही ते म्हणाले.

या संदर्भात संजोग वाघेरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अटल मिशन योजनेअंतर्गंत पिंपरी – चिंचवड महापालिकेने 148 कोटी रुपयांची काम पिंपरी चिंचवड शहरात जुन्या सांडपाणी नलिका काढून तेथे नवी नलिका टाकणे आणि चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथे तीन एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर पारदर्शक कारभाराचा बोलबाला करत पहिल्या वर्षी सत्ताधा-यांनी याची निविदा काढली होती. तर हे काम 2018 मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले होते. तेव्हापासून दरवर्षी 12 महिने शहरात खोदाई चालू असताना मुदतीत हे काम पूर्ण करता आलेले नाही. या कामावर सव्वाशे कोटींहून अधिक खर्च झालेला असताना काम अर्धवट स्थितीत असताना महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने ते बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर  आणखी 122 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. चुकीच्या पध्दतीने हे काम काढण्यात आले. पिंपरी- चिंचवड शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करत सत्तेतून पायउतार होताना सत्ताधा-यांनी या कामाला मान्यता देखील दिली. या कामाच्या संदर्भात या आधीच्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला होता. एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढून, तसेच सल्लागार, कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करून महापालिका तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा सगळा प्रयत्न असून यातील त्रृटी  राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात आणून दिल्या होत्या.

भाजपने घाई-गडबडीत कामाला मान्यता दिली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या कामासंदर्भात तक्रारी पोहोचल्यानंतर महापालिका प्रशासनाने या कामाला वर्क ऑर्डर देणे टाळले आहे. या संपूर्ण कामाची तपासणी होणार आहे. तपासणीनंतर पुढील कार्यवाही होणार असल्यामुळे  भाजपच्या लुटीच्या धोरणाला ब्रेक लागला आहे, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.