Pimpri News: विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा राजीनामा, नवीन विरोधी पक्षनेता कोण असणार?

1 ऑगस्ट 2019 रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारलेल्या नाना काटे यांचा वर्षांचा कार्यकाल 1 ऑगस्ट 2020 रोजी संपुष्टात आला आहे.

एमपीसी न्यूज – पक्षाने ठरवून दिलेला एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज (बुधवारी ) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी स्वीय सहाय्यकामार्फत राजीनामा दिला आहे. दरम्यान, नवीन विरोधी पक्षनेता कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पहिल्यांदाच विरोधात बसावे लागल्याने अधिकाअधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2019 रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारलेल्या नाना काटे यांचा वर्षांचा कार्यकाल 1 ऑगस्ट 2020 रोजी संपुष्टात आला आहे.

त्यामुळे पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार काटे यांनी राजीनामा दिला आहे. काटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्वीय सहाय्यकामार्फत त्यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.

नवीन विरोधी पक्षनेता कोण असणार ?

विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक आहेत. त्यांनी हे पद मिळावे यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत.

यामध्ये गव्हाणे, मिसाळ, घोडेकर यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. या पाचपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.