Pimpri News: सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या फलकांवरुन कमळ, नेत्यांचे फोटो होऊ लागले गायब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजताच सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी फलकांवरील ‘कमळ’ गायब करायला सुरुवात केली. केंद्र, राज्यस्तरावरील नेत्यांचेही फोटो गायब करत पक्षांतर करण्याचे स्पष्ट संकेतच दिले जात आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर घाऊक स्वरुपात पक्षांतर घडेल असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. नगरसेवकांच्या पुन्हा राष्ट्रवादीतील घरवापसीमुळे ‘कमळ’ कोमेजू नये यासाठी संभाव्य पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांची भाजपकडून मनधरणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे कामकाज सुरु झाले. प्रभाग रचना केली जात आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक तयारीला लागलेत. 2017 च्या निवडणुकीवेळी राज्यात भाजप सत्तेत होती. भाजपचे वातावरण असल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी घाऊक स्वरुपात भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना पावन करुन घेतले. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कमळ फुलले. पण, साडेचार वर्षात जवळपास 20 नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. त्यामुळे ते पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. बरोबर पाच वर्षांनी चक्र उलटे फिरु लागले. मागीलवेळी राष्ट्रवादीला जशी गळती लागली होती. तशी गळती आता भाजपला लागेल असे राजकीय जाणकार सांगतात.

नगरसेवकांनी सोशल मीडियातून प्रचार सुरु केला. फलकबाजी केली जाते. पण, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी त्यावरुन कमळ, नेत्यांचे फोटो गायब केले. कोणत्याही पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही. चिखली, चिंचवड स्टेशन भागातील भाजप नगरसेवकांचा नुकतेच वाढदिवस झाला. त्यानिमित्त केलेल्या फलकबाजीवर भाजपचे कमळ नाही. केंद्रीय, राज्यस्तरावरील एकाही नेत्याचा फोटो नाही. मागील साडेचार वर्षात एकही पद न मिळालेले नगरसेवक, राष्ट्रवादीतून आलेले नगरसेवक पुन्हा घरवपासीच्या तयारीत आहे. भाजपचे 8 ते 9 नगरसेवक सध्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातो.

भोसरीतील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे, चिखलीतील नगरसेवक संजय नेवाळे यांनी तर राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजप नगरसेविका माया बारणे यांची पती संतोष बारणे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे पक्षांतर होण्याच्या चिंतेने भाजपला ग्रासले आहे. जे नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादीत जाऊ शकतात. अशा नगरसेवकांच्या भाजप नेतृत्वाकढून भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

लाच प्रकरण प्रचाराचा मुद्दा?
‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ म्हणत सत्तेचा सोपान पार करणाऱ्या भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला पोलिसांनी लाच प्रकरणी अटक केली. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या लाच प्रकरणात भाजपची प्रतिमा डागाळली. लाच प्रकरणाने भाजपची पुरती बदनामी झाली. मागील निवडणुकीत मूर्ती घोटाळा गाजला. त्याचा राष्ट्रवादीला फटका बसला. आता या निवडणुकीत लाच प्रकरण प्रचाराचा मुद्दा होणार यात तिळमात्र शंका नाही. त्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुंपणावरील नगरसेवकांनी आत्तापासूनच उड्या मारण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.