Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा म्हणजे निवडणुकीचा स्टंट – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा महापालिकेवरील मोर्चा म्हणजे निव्वळ 2022 च्या निवडणुकीचा स्टंट आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शहरातील जनतेचा कळवळा नसून स्वार्थी राजकारणासाठी केलेले प्रदर्शन आहे. भ्रष्टाचार झाला म्हणणाऱ्यांकडे कोणताही पुरावा नाही.  2017 पासून महापालिकेच्या सर्व समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुध्दा नगरसेवक सदस्य आहेत. भ्रष्टाचार झाला असे म्हणता तर मग त्या वेळी तुम्ही व तुमचे पदाधिकारी गप्प का बसले ? असा सवाल सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.  

ढाके म्हणले, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सन 2017  पासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पार्टीने शहराचा मोठ्या प्रमाणात सर्वांगीण विकास करुन शहराचे पुढील 30 वर्षाचे नियोजन केलेले आहे. शहरात वैद्यकीय सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा, नागरवस्ती विकासाच्या माध्यमातुन शहरातील दिव्यांग, कष्टकरी नागरिक, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी नव्याने आणलेल्या योजना, सावित्रीबाई फुले विद्यापीठा सोबत केलेले करार,  स्मार्ट सिटी अंतर्गत स्कील डेव्हलटमेंट, इन्क्युबिशन सेंटर च्या माध्यमातुन युवक युवतींना स्टार्ट अप बरोबरीनेच कोविड काळात शहरातील नागरिकांना उच्च प्रतिच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्याचबरोबर कोविड लसीकरण मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्राध्यान्य देवुन केंद्रसरकारने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाचे नियोजन केले.

राज्यामध्ये ई-गव्हर्नन्समध्ये पिंपरी चिंचवड म.न.पा.स प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून  शहर देशपातळीवर प्रगत औदयोगिक शहर म्हणुन ओळखले जाते. याशिवाय या सत्ताकाळात शहराला देशपातळीवर वेगवेगळी पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.  मुळात महापालिकेत गेल्या 20 ते 25 वर्षापासून या मंडळीचीच ठेकेदारी आहे. याच मंडळींनी महापालिकेच्या विविध मिळकतींमध्ये आपली स्वत: ची व्यवसाय व दुकाने थाटली आहेत.  ज्यांनी या महापालिकेला लुटून खाल्ले तीच मंडळी आज साळसूदपणाचा आव आणून प्रदर्शनाचे सोंग करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.