Pimpri News : पोलिसांची ‘ही’ मुजोरी रोखावी, प्रदीप नाईक यांचे गृहमंत्र्यांना साकडे !

एमपीसी न्यूज – सर्वसामान्यांना जनावरासारखे काठीनेे मारणाऱ्या पिंपरी -चिंचवड पोलिसांना कोण आवरणार, असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एका निवेदनाच्या माध्यमातून विचारला आहे.

शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी 11 च्या पुढे विनाकारण नागरिकांनी बाहेर पडू नये, असा नियम आहे. नागरिक देखील आपली जबाबदारी ओळखून शासनाच्या सूचनांचे पालन करीत आहेत. परंतु, काही अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कोणतीही शहानिशा न करता पोलीस काठीने झोडपून काढत असल्याचा व्हिडिओ नाईक यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांना पाठवला आहे.

नातेवाईक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. परिस्थिती गंभीर आहे. डॉक्टरांनी रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शन्स आणण्यासाठी बाहेर पाठविले आहे. अशा वेळेस तो हवालदिल झालेला नातेवाईक मेडिकल स्टोअर्स शोधत फिरत आहे. आणि सिग्नलवर कायद्याचे रक्षक आपल्या हातातील काठीने एखाद्या जनावराला मारावे तसे अगदी निर्दयपणे मारत आहे. ती व्यक्ती गयावया करीत आहे. कारण सांगत आहे. पण निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारण ऐकून घेण्याची गरज वाटत नाही, असे नाईक यांनी म्हटले आहे.

आपण ही सर्व माहिती गृहमंत्र्यांच्या कानावर घातली असल्याचे प्रदीप नाईक यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर राज्यभरात तोच प्रकार चालू आहे. मागील आठवड्यात नागपूर शहरात पोलीस उपनिरीक्षकाने एका गरीब भाजी विक्रेत्या महिलेला केवळ रस्त्यावरील भाजी दुकान बंद करायला वेळ झाला म्हणून तिची संपूर्ण भाजी रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकून दिली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिला रडू कोसळले. ‘अरे तुम्हाला एखाद्याचे अश्रू पुसता येत नसतील, तर किमान त्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही हे तरी पहा’, असे नाईक यांनी म्हटले आहे.

दुसरी घटना जालना शहरातील, तेथे एका इसमाने रुग्णालयात गोंधळ घातल्याने चार ते पाच पोलिसांनी अक्षरशः काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली. मग मला असा प्रश्न पडतो, की हे नक्की पोलीस आहेत की वर्दीतील गुंड? जनतेमध्ये या पोलिसांची काय प्रतिमा असते? ही प्रतिमा कुठेतरी बदलली पाहिजे. पोलिसांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाही. त्यांचे समुपदेशन करायला पाहिजे, असे प्रदीप नाईक यांनी शेवटी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.