Pimpri news: टक्केवारीसाठी ‘स्थायी’त ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदीचा ठराव स्थगित; राष्ट्रवादीचा आरोप

‘रेमडेसिवीर’ खरेदी करा; अन्यथा महापालिकेस टाळे लावू

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून गंभीर, अतिगंभीर रुग्णांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासत आहे. या इंजेक्शनची तातडीची गरज असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदीचा ठराव स्थगित करण्यात आला.या माध्यमातून सत्ताधारी टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवारी) महापालिका आवारात आंदोलन केले.

आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, फझल शेख आदी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशव्दारासमोर स्थायी समितीचा निषेध करुन निदर्शने केली. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.

महापालिका क्षेत्रात मागील दहा दिवसांपासून कोरोना कोविड – 19 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 7 एप्रिल रोजी 2784 रुग्ण बाधित झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 24275 पेक्षा जास्त आहे. शहरातील बहुतांशी कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत.

बहुतांशी रुग्णांना ऑक्सिजन तसेच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासत आहे आणि या इंजेक्शनमुळेच रुग्ण बरे होत आहेत. अशी या इंजेक्शनची तातडीची गरज असताना पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन अगतीकपणे स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी ठराव स्थगित करण्यात आला. टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जीवाशी खेळणे हे मानवतेला कलंक आहे.

शहरातील रुग्णांच्या जीवीताचा विचार करुन आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतःच्या अधिकारात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी करावीत आणि हजारो रुग्णांना दिलासा द्यावा; अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, रुग्णसंख्या वाढल्यामुळे शहरातील बऱ्याच रुग्णांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासू लागली आहे. परंतु शहरातील खाजगी औषध दुकानदारांनी रुग्णांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या बाबतीत कृत्रिम तुटवडा निर्माण केलेला आहे. तथापि आज अखेर महापालिकेच्या सर्व रुग्णालयासाठी भांडार विभागामध्ये 900 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन शिल्लक आहेत.

तसेच तातडीची बाब म्हणून बाहेरुन वाढीव 200 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. असे 1100 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन सध्या महापालिकेकडे उपलब्ध आहेत. हे इंजेक्शन महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांसाठी आवश्यक्तेनुसार मोफत दिली जात आहेत.

महापालिकेची जबाबदारी लक्षात घेत 6 एप्रिल रोजी 7500 ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन पुरवठा करणेसाठीचा खरेदी आदेश संबधित पुरवठादारास देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झाला नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करणे हा प्रकार म्हणजे निव्वळ चमकोगिरी असल्याची टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.