Pimpri News: कार्यकाळ संपणार 13 ला अन् सर्वसाधारण सभा केली 17 मार्चपर्यंत तहकूब; स्थायीत नवीन सदस्यांची निवड टाळली

फेब्रुवारीच्या सभेबाबत नवीन महापौर निर्णय घेणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. परंतु, सत्ताधारी भाजपने फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा 17 मार्चपर्यंत तहकूब केली. भाजपने स्थायीत नवीन सदस्य निवडण्याचेही टाळले. त्यामुळे आठ सदस्यच 13 मार्चपर्यंत स्थायी समिती चालविणार असून त्यातील एकाची सभेच्याअध्यक्षस्थानी निवड केली जाईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. भारतरत्न लता मंगेशकर, उद्योजक राहुल बजाज, माजी मंत्री सुधीर जोशी, माजी खासदार गजानन बाबर, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांना श्रद्धांजली वाहून आजची सभा 17 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. स्थायी समितीतील भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर या दोन अशा आठ सदस्यांचा स्थायी सदस्यत्वाचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत निवड करणे अपेक्षित होते. परंतु, सत्ताधारी भाजपने नाराजी वाढू नये यासाठी नवीन 8 सदस्यांची निवड करण्याचेच टाळले. सर्वसाधारण सभा 17 मार्चपर्यंत तहकूब केली. त्यामुळे भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे 13 दिवसांसाठी तरी स्थायी समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न भंगले.

स्थायी समितीचा कारभार 13 मार्चपर्यंत 8 सदस्यच करणार!

स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे नितीन लांडगे, सुजाता पालांडे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे यांना 13 दिवसांचा वाढीव कालावधी मिळला आहे. लांडगे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीलाच संपत आहे. स्थायी समिती बरखास्त होत नाही. त्यामुळे 1 मार्चपासून आठ सदस्यच स्थायी समितीचा कारभार करणार आहेत. सर्व सदस्य मिळून एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करतील. 13 मार्चपर्यंत स्थायी समितीच्या दोन सभा होऊ शकतील.

फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेचे भवितव्य नवीन महापौरांच्या हाती!
फेब्रुवारी महिन्यातील सभेच्या विषयपत्रिकेवर पाळीव प्राण्यांना आवश्यक सोय सुविधांचे आधुनिकीकरण व स्पेशलाईज सेवा देण्यासाठी औंध येथे एक सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणे, पिंपरी – चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे, महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे नामकरण करण्याचे देण्याचे विषय मान्यतेसाठी ठेवले होते. पंरतु, वादाची किनार नको म्हणून भाजपने 17 मार्चपर्यंत सभा तहकूब केली. विद्यमान सभागृहाचा कालावधी 13 मार्चला संपणार असून त्यानंतर प्रशासकीय राजवट येणार आहे. त्यामुळे नवीन महापौर या सभेबाबत निर्णय घेतील, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.