Pimpri News: शहरात प्रथमोपचारासाठी जागोजागी ‘जिजाऊ क्लिनिक’; सर्व प्रभागांत फूड कोर्ट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी आर्थिक वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकरीता तातडीणे प्रथमोपचार करणेकामी शहरात जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु करणार आहे. तर, महापालिकेच्या आठही प्रभागांत फूड कोर्ट विकसित करण्यात येणार आहे.

महापालिकेचा सन 2022-23 या आर्थिक वर्षांचा मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यात आगामी आर्थिक वर्षात विविध महत्वाचे उपक्रम जाहीर केले आहेत. सन 2015 मध्ये दिल्ली मोहल्ला क्लिनिक या मॉडेलची प्रेरणा घेऊन, मनपा हद्दीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकरीता तातडीणे प्रथमोपचार करणेकामी जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामध्ये समाजातिल सर्व घटकांपर्यंत पोहचता येण्याजोग्या वैद्य किय आणि आरोग्य सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. या माध्यमातून शहरातील बहुसंख्य नागरिकांना सहज आणि मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. याबरोबरच नविन भोसरी रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय, नविन थेरगाव रुग्णालय, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आकुर्डी ही रुग्णालय 24 तास सुरु ठेवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सर्व प्रभागांत फूड कोर्ट विकसित करणार

शहरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि नागरिकांना जागोजागी खानपानाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शहरात फूड कोर्ट विकसीत केले जाणार आहे. या फूड कोर्टवर नागरिकांना वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळणार आहेत. या बरोबरच महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू करणे, असे महत्त्वाचे उफक्रम राबविण्यात येणार आहे

आरोग्यसेवेसाठी उभारणार ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’

सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ उभारणार आहे. महापालिका आणि यूएनडीपीने देशाच्या पहिल्या ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ची आखणी आणि अंमलबजावणी यावर चर्चा सुरु केली आहे. यूएनडीपी, संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था आहे. आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे यांचे महत्वाचे कार्यक्षेत्र आहे.

पिंपरी महापालिका केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. काही रुग्णालयांना असंसर्गजन्य रोगांकरिता विशिष्ट उपचार केंद्रांमध्ये (एनसीडी) रुपांतरित करण्याची योजना आखत आहे. नागरिकांना उपलब्ध होणा-या आरोग्य सेवांच्या सुधारित स्तरासाठी महापालिका पायाभूत सुविधा सुधारणे, आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेची क्षमता वाढविणे यासाठी यंत्रणेची स्थापना, प्रक्रिया आणि प्रोटोकॉलचे मानांकीकरण यासाठी गुंतवणूक करणार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ हा दृष्टीकोन विचारात घेण्यात येत आहे. हा एक परिणाम आधारित वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीचा दृष्टीकोन आहे. जेथे गुंतवणूकदारांना योग्य तो निकाल मिळाल्यानंतर मोबदला दिला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.