Pimpri News: महिला बालकल्याण समितीचे अनावश्यक खर्चाचे विषय दफ्तरी दाखल करा : राहुल कोल्हटकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला बालकल्याण योजने अंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील सर्व बालवड्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांमध्ये 118 वॉटर फिल्टर व वॉटर कुलर बसवण्याच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केले आहेत. कोरोनात सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे हा अनावश्यक खर्च आहे. त्यासाठी अनावश्यक खरेदीचे कारण दाखवत हे विषय दफ्तरी दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुूक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकटामुळे गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन व इतरही परिस्थितीत सामान्य जनतेसोबतच प्रशासनही हतबल झाले आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या वतीने नागरीकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन असल्याने शहरात कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. पण, महाराष्ट्र राज्य सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून लहान मुलांच्या करिता वैदकिय सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

एका बाजूला महापालिका प्रशासन उत्पन्नवाढीकरीता विविध मार्ग/ स्त्रोत शोधत असताना याच काळात शिक्षण विभागाने ठेकेदार पोसण्याकरीता कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक साहित्य खरेदीचे विषय मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवले. पण शहरातील सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांच्या विरोधामुळे स्थायी समितीने ते विषय दप्तरी दाखल केले.

हा विषय ताजा असतानाच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला बालकल्याण योजने अंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभाग कडील सर्व बालवड्या प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा यांमध्ये 118 वॉटर फिल्टर व वॉटर कुलर बसवण्याच्या खर्च यास मान्यता देणे कमी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या बालवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांना मदर तेरेसा शिक्षण मंडळाकडील बालवाडी वा प्राथमिक शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासात्मक योजना या लेखाशीर्षक वरील उपलब्ध तरतुदीनुसार दर तीन महिन्यांनी स्वच्छत किट पुरवण्यासाठी स्वछता किटची खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आज शाळा बंद असताना सुद्धा गरीब विद्यार्थ्यांच्या विकासाच्या व आरोग्याच्या नावावर अनावश्यक साहित्य खरेदीकरीता कोट्यावधी रूपये खर्च करण्याचे प्रस्ताव महिला बालकल्याण समितीच्या वतीने स्थायी समितीच्या बैठकी समोर ठेवण्यात आले आहे.

महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी ठेकेदार पोसण्याकरिता सध्याच्या परिस्थितीत अनावश्यक असणाऱ्या साहित्य खरेदीचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते करदात्या नागरिकांच्या कररुपी पैसे ठेकदाराच्या खिशात घालण्या करिता ठेवले आहेत. आयुक्त व स्थायी समिती अध्यक्षांनी अनावश्यक खरेदीचे कारण दाखवत हे विषय दफ्तरी दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.