Pimpri News: सत्ताधारी ‘हरित सेतू’ उपक्रमासाठी घेणार 1 कोटींचा सल्ला

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या हरित सेतू उपक्रमासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या सल्लागाराला जमीनीच्या अभ्यासापासून रस्ते, पथरचना, सर्वसमावेशक भुशास्त्रीय सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी सल्लागारावर एक कोटी रूपये खर्च होणार आहेत. याबाबतच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत हरित सेतू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी कामाचे स्वरूप ठरविण्यात आले.

 

त्यामध्ये सद्यस्थितीतील वाहतुकीचा आणि जमीन वापरण्याच्या प्रयोजनांचा आढावा घेऊन अभ्यास करणे, महापालिका हद्दीतील विकास आराखड्यानुसार व प्रत्यक्ष जमीन वापराचा अभ्यास करणे, रस्त्याच्या रूंदीचा विकास आराखडा व प्रत्यक्ष जागेवरील रस्ता याबाबत आढावा घ्यावा लागणार आहे. पादचारी आणि सायकल चालविण्याच्या सुविधांचे सर्व्हेक्षण करणे, क्रॅश डेटाचे विश्लेषण करणे, हरित सेतूकरिता रस्त्यांचे जाळे तयार करणे, फक्त एनएमटी करिता वापरात येतील असे रस्ते सर्व्हेक्षण करून तसे प्रस्तावित करावे लागणार आहे.

हरित सेतू अंतर्गत रस्त्यावर आकर्षक व विश्रांतीची स्थळे ओळखणे, पादचारी आणि सायकलस्वार यांच्याकरिता सार्वजनिक संस्थामधील क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील जवळचे मार्ग प्रस्तावित करणे, पादचारी, सायकल, दुचाकी आणि इतर वाहनांकरिता सर्व समावेशक पथ रचना तयार करणे, अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक तयार करणे, नागरी रस्ता डिझाईन धोरण आणि हरित सेतू नेटवर्क परिसरातील क्षेत्रासाठी मार्गदर्शक तत्वे आखावी लागणार आहेत.

रस्ते देखभाल दुरूस्तीसाठी पुस्तिका तयार करणे, रस्ता वाहतुक व्यवस्थापन आणि अंमलबजावणी मॅन्युअल तयार करणे, पथदर्शी प्रकल्पासाठी हरित सेतू नेटवर्कसाठी सार्वजनिक रस्त्यावर असलेले सर्व समावेशक भुशास्त्रीय सर्व्हेक्षण  करावे लागणार आहे.

पथदर्शी क्षेत्राचे रहदारी सर्व्हेक्षण करणे, पथदर्शी प्रकल्पासाठी स्पेसिफिकेशन, इंजिनिअरींग रेखांकनाचे आराखडे केलेल्या कामाचे परिमाण, किमतीची बीले आणि निविदा दस्तऐवज तयार करणे आदी कामे सल्लागाराला करावी लागणार आहेत.

या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन निविदाधारक पात्र ठरले. त्यामध्ये प्रसन्ना आत्माराम देसाई यांना 95 गुणांक मिळाले. मात्र, त्यांनी 1 कोटी 11 लाख रूपये दर सादर केला होता. त्यांना दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानुसार, त्यांनी 99 लाख रूपये सुधारीत दर सादर केला. त्यानुसार, त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.