Dehuroad News : अभ्यास न करता सतत मोबाईलवर गेम खेळत असल्याने आई ओरडली; पंधरा वर्षीय मुलाने सोडले घर

एमपीसी न्यूज – अभ्यास न करता सतत मोबाईलवर गेम खेळत असल्याने आई मुलाला ओरडली. या कारणावरून 15 वर्षीय मुलाने चक्क घर सोडले. हा प्रकार देहूरोड येथे घडला आहे.

याबाबत 32 वर्षीय आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञातांनी त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादी महिलेचा संशय आहे.

साहिल मुकेश राज (वय 15) असे घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल इयत्ता नववी मध्ये देहूरोड बाजार येथील शाळेत शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास साहिल हा अभ्यास न करता मोबाईलवर गेम खेळत होता.

त्यामुळे फिर्यादी साहिलवर ओरडल्या आणि त्याला मारले. त्यानंतर साहिलने कोणाला काहीएक न सांगता घर सोडले. फिर्यादी यांनी त्याचा आजूबाजूला, नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र साहिलचा पत्ता लागला नाही. त्यामुळे अज्ञातांनी साहिलला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला.

साहिलीची उंची 175 सेंटीमीटर, रंग सावळा, बांधा सडपातळ, चेहरा उभट, केस काळे बारीक, अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट, राखाडी पॅंट, पायात चॉकलेटी स्लीपर, ओठाच्या वर तीळ असून त्याला हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा अवगत आहेत. वरील वर्णनाच्या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास देहूरोड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.