Pimpri News: ‘रोजगार की बात’ कधी करता ? काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज  –  नोटबंदी, जीएसटीने अर्थकारणाला खिळ बसलेली आहे. त्यातच  कोरोनाच्या लाटेने रोजगाराची समस्या भयानक झाली आहे. दोन हजारापेक्षा अधिक छोट्या – मोठ्या कंपन्या बंद पडल्या. नोक-या व रोजगाराला गती देणे महत्वाचे असताना तसे होत नाही.  केंद्र सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगारांचे दिलेलं आश्वासन सपशेल  खोटे होते. केंद्र सरकार रोजगाराची बात कधी करणार असा सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघा, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे रोजगार- स्वंयरोजगार अभियान अंतर्गत    बेरोजगारांना मोफत  प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल कामगार, ऑपरेटर, यंत्र चालक अशा पदावर योग्य ठिकाणी नोकरी देण्याच्या योजनेसाठी नाव नोंदणीला सुरुवात करण्यात आली. यात 18 ते 35 वयोगट व किमान १० वी पास लाभार्थीना याचा मोफत लाभ देण्यात येणार आहे. महासंघाचे उपाध्यक्ष भास्कर राठोड, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, उपाध्यक्ष राजेश माने, राजु बिराजदार, यशोदा मोरे, रंजना कदम, वनिता भोसले, अनिल वाघमारे, संजय पवार आदी उपस्थित होते.

 

“देशभरामध्ये बेरोजगारीची संख्या कोटीच्या घरांमध्ये असून सरकारी पातळीवर  त्यांचेसाठी काय खास नियोजन झालेले  दिसत नाही.  देशात लघु , सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांची स्थिती वाईट आहे.  सन 2016  पासून 2 हजार कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या  आहेत.  आता  उद्योगांना व रोजगारांना बळ देण्याची गरज आहे, मात्र तरूणांनी भज्जी तळत बसावे, अशी खिल्ली उडवली जाते. बाजारात मागणी वाढल्यास उत्पादन वाढते आणि  रोजगाराच्या संधी निर्माण होतात हे सूत्र  आहे. सुशिक्षित युवकांना चांगल्या नोकऱ्यांच्या संधी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा असा सल्लाही बऱ्याच वेळा दिला जातो मात्र स्वतःचा उद्योग करण्यासाठी बँक  अर्थ सहाय्यासाठी उभी करत नाही अशी स्थिती आहे.

 

पूर्वी मनरेगाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र लाखो लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)च्या माध्यमातून कामे मिळण्यास सुरुवात झाली. या योजनेत 31 कोटी 80 लाख मजुरांची नोंद करण्यात आली  यातून त्याची गरज अधोरेखीत होत आहे. अशा योजना शहरी भागात निर्माण करून त्यातून रोजगार दिल्यास कोरोनामुळे अडचणीत सपडलेल्यांसाठी  महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मात्र गाजावाजा  करण्यापेक्षा  प्रत्यक्ष  रोजगार निर्मिती मह्त्वाची आहे .देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने श्रमिकांच्या खांद्यावर आहे परंतु त्यांची कधीच नोंद होत नाही”, असे नखाते म्हणाले. प्रास्ताविक  राजेंद्र कदम यांनी तर आभार  तुकाराम माने यांनी  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.