Pimpri News: लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागतोय, ही विटंबना तत्काळ थांबवा – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याचे समोर आले. यावर पर्याय म्हणून पदपथ फोडून त्या जागेत दफनविधी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले. लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीत मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, दत्तनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अण्णासाहेब नगर, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. मात्र, जागा माळरानाची असल्यामुळे दफन करण्यासाठी खड्डा खोदाईसाठी खूप परिश्रम पडतात. काळेवाडीकडून आयुक्त बंगल्याकडे जाणाऱ्या बीआरटीएस मार्गात याच दफनभूमीची काही जागा जाणार होती.

जेवढी जाईल तेवढीच जागा लगतच्या ऑटोक्लस्टरच्या मोकळ्या जागेत मिळावी, अशी मागणी करत पर्यायी जागा मिळेपर्यंत रस्ता होऊ देणार नसल्याची भूमिका घेतल्याने ऑटोक्लस्टरच्या जागेत शिवकैलास लिंगायत दफनभूमी क्रमांक दोन तयार झाली. दफनभूमी क्रमांक एक येथील अंत्यविधीसाठी जागा संपल्यामुळे दोन क्रमांकाच्या दफनभूमीत अंत्यविधी करण्यास सुरवात झाली. सद्यःस्थितीत जागा शिल्लक नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पदपथ फोडून त्या जागेत अंत्यविधी सुरु आहेत. यामुळे व्यक्तीची मरणोत्तर हेळसांड, विटंबना होत असल्याची तक्रार आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. दफनभूमी क्रमांक एकमध्ये अंत्यविधी झालेल्या जागेतील माती काढून चार फूट नवीन पोयटा माती भरावी. अन्यथा त्या मातीवरच चार फूट नव्याने माती भरावी, म्हणजे समस्येचे निराकरण होईल, असा उपायही त्यांनी सुचविला आहे.

त्यावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले आहे. ते म्हणतात, ”लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? @Pcmcindiagovin लोकसंख्येनुसार दफनविधीसाठी पुरेशी जागा आहे की नाही हे पाहण्याचे काम आपले नाही का!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.