Pimpri News: चाळीस वर्षांच्या मैत्रीचा धागा अचानक निसटला; गजाजन चिंचवडे यांच्या आठवणी सांगताना खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांना अश्रू अनावर

एमपीसी न्यूज –  राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, मी आणि गजानन चिंचवडे लहानपणापासूनचे मित्र, सर्वजण शाळेत सोबत होतो. पुढे  राजकारणात सर्वजण वेगळे झाले. पण, गजानन माझ्याबरोबर सावलीसारखा राहिला. गजानन राजकारणातून माझ्यापासून दूर जाईल, असे कधी वाटले नव्हते. पण त्याला योग्य वाटले म्हणून त्याने सहा महिन्यांपूर्वी वेगळा मार्ग निवडला. तेव्हापासून आमचे बोलणे थांबले होते. परंतु, गजानन कायमचा दूर गेला. इतक्या वर्षाची मैत्री आणि माझ्या प्रत्येक राजकीय  वाटचालीत गजाननचा असलेला सहभाग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. राजकारणातील स्थित्यंतरे  बदलत जातात. परंतु, चांगला मित्र गेल्याचे मोठे दुःख मनामध्ये असल्याचे सांगताना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना अश्रू अनावर झाले.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले चिंचवडगावातील हाडाचे कार्यकर्ते गजानन चिंचवडे यांचे 52 व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. 40 वर्षांपासूनच्या मित्राबाबत बोलताना खासदार बारणे यांना अश्रू अनावर झाले. बारणे म्हणाले, सकाळी जनसंपर्क  कार्यालयात बसलो होतो. अचानक  गजानन चिंचवडे यांच्या मुलाचा फोन आला. तो रडत होता. मी तातडीने त्यांच्या घरी गेलो. तेथून आम्ही सर्वांनी लोकमान्य हॉस्पिटल गाठले. परंतू, देवापुढे काही चालले नाही. 40 वर्षे शाळेपासून सुरू झालेल्या मैत्रीतील एक धागा कायमचा निसटला. माझा सहकारी, जिवलग मित्र व पुढे माझ्या प्रत्येक राजकीय घटना घडामोडींचा साक्षीदार, माझ्यासोबत गजानन सावलीसारखा  राहिला होता. उत्कृष्ट संघटक होता. निवडणूक व्यवस्थापन व समाजातील सर्व स्तरातील मंडळींशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा त्याचा स्वभाव होता. सर्वांना आदराने बोलायचा, अतिशय मनमिळाऊ स्वभाव गजाननचा होता.

गजानन शालेय जीवनापासून माझ्या बरोबर सावलीसारखा राहिला. गजानन राजकारणातून माझ्यापासुन दूर जाईल, असे कधी वाटले नव्हते. पण त्याला योग्य वाटले म्हणून त्याने सहा महिन्यांपूर्वी वेगळा मार्ग निवडला. पण, त्याने माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी केले नाही.

गजाजनने गेली 21 वर्षे माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याचा पायंडा व प्रघात  पाडला होता. मागील वर्षी 16 फेब्रुवारी माझ्या वाढदिवशी त्याच्या संकल्पनेतून कोरोना काळात सेवा केलेल्यांचा गौरव केला. पुढील आठवड्यातच माझा वाढदिवस आहे. जर तो भाजपात गेला नसता तर आतापर्यंत त्याने  माझ्या वाढदिवसाची सर्व तयारी केली असती. माझ्यासोबत सावली सारखा राहिलेल्या गजाननला मी कधीच विसरू शकत नाही. गजाननच्या अकाली जाण्याने त्याची दोन मुले पोरकी झाली आहेत. गजाजन आणि मी अनेक वर्षे एकत्र काम करत होतो. आम्ही मित्र त्याला गजाभाऊ या नावाने संबोधायचो. कोणत्याही कामाचे अचूक नियोजन गजाभाऊ करत असे. गजाभाऊ सारख्या मित्र होणे नाही, अशी भावना गजानन चिंचवडे यांचे खास मित्र असलेले बांधकाम व्यावसायिक रवींद्र नामदे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.