Pimpri: राहुल कलाटेंची तत्परता अन् खासदार डॉ. कोल्हेंमुळे वाकडच्या विद्यार्थ्यांला पोलंडमध्ये मिळाली वैद्यकीय मदत

एमपीसी न्यूज – शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे मूळचा वाकडचा रहिवाशी असलेल्या आणि पोलंड येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या ओंकार विनोदे या विद्यार्थ्याला काही तासांत वैद्यकीय मदत मिळाली आहे. पोलंड येथील भारताचे राजदूत त्सेवांग नामग्याल यांनी ही मदत मिळवून दिली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी तत्परता दाखवत ही बाब खासदार डॉ. कोल्हे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याबाबतची माहिती देताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, वाकड येथील रहिवाशी असलेला ओंकार यशवंत विनोदे हा पोलंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. दोन दिवसांपासून त्याला छातीचा आणि पाठीचा त्रास होत होता. त्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. त्याने अधिक त्रास होत असून तत्काळ वैद्यकीय मदत हवी असल्याबाबत मला ‘एसएमस’ केला. त्यानंतर मी ही बाब खासदार डॉ. कोल्हे यांना सांगितली आणि मदत करण्याची विनंती केली.

त्यावर डॉ. कोल्हे यांनी तातडीने भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले. पोलंड येथील भारतीय दूतावासातील राजदूतांना ओंकारला मदत करण्यासाठी कळवावे अशी विनंती केली. त्याची तत्काळ दखल घेत परराष्ट्रमंत्र्यांनी पोलंड आणि लिथुआनिया येथील भारताचे राजदूत त्सेवांग नामग्याल यांना मेल फॉरवर्ड केला. ओंकारला मदत करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर राजदूतांनी ओंकार याच्याशी संपर्क साधला. कॉन्फरन्स कॉलद्वारे जनरल फिजिशियन समवेत त्याला होणाऱ्या त्रासाची माहिती घेतली आणि ओंकारला औषध घेवून आराम करण्याचा सल्ला दिला. यामुळे काही तासात ओंकारला मदत मिळाल्याचे कलाटे यांनी सांगितले. तसेच पोलंड येथील भारताचे राजदूत नामग्याल यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल द्वारे याबाबतची माहिती कळवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.