Pimpri: भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरुच; तुषार कामठे यांचा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील राजीनामा नाट्य काही केल्या संपत नाही. सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली तरी नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. पिंपळे निलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिला आहे. काही वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे. सर्वप्रथम शीतल शिंदे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधी समिती मागितली असताना क्रीडा समिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्तीनंतर पाचच मिनिटात क्रीडा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

  • जाधववाडीचे वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता तुषार कामठे यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मागील दोन वर्षांपासून सदस्यत्वाची जबाबदारी निष्ठेने सांभाळली. शहर हरित होण्यासाठी उपक्रम राबविले. परंतु, काही वैयक्तिक कारणास्तव वृक्ष समिती सदस्यत्वास पूर्णपणे न्याय देणे शक्य नाही. त्यामुळे कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली आहे

  • दरम्यान, महापालिकेतील भाजप सत्तेला अडीच वर्ष पूर्ण होत आली. तरी, वृक्ष प्राधिकरण समितीशिवाय दुसरे कोणतेही पद मिळाले नाही. त्या नाराजीतूनच कामठे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.