Pimpri : नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी, अमरावतीमध्ये केलीय बंडखोरी

एमपीसी न्यूज – पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधातच बंडखोरी केलेल्या पिंपरी महापालिकेतील भाजपच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई शुक्रवारी (दि. 11) करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवक बंडखोरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने ओव्हाळ यांची यापूर्वीच हकालपट्टी केली आहे. तर, कलाटे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीच्या माजी सभापती असलेल्या सीमा सावळे या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. भाजपने तिथे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने सावळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सावळे प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगरमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. भाजपची सत्ता येताच पहिल्या वर्षी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.