Pimpri : वाहतूक पोलिसांनी उतरवल्या 11 हजार वाहनांच्या काळ्या काचा!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग (Pimpri) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 11 हजारांहून अधिक वाहनांच्या ब्लॅक फिल्मिंग बाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काळ्या काचा उतरवून वाहन चालकांवर आर्थिक दंडाची देखील कारवाई करण्यात आली आहे.

1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असणाऱ्या 11 हजार 658 वाहनांवर कारवाई केली. वाहनांच्या काचा काळ्या असणे हे स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. मात्र, वाहनांच्या काचा काळ्या करणे, त्या पारदर्शक नसणे हा अपराध आहे. यामुळे अनेकदा अपघात, गैरकृत्ये होत असल्याचे समोर येते. काळ्या काचा असणाऱ्या वाहनातून अवैध मालाची विक्री देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांच्या काचा पारदर्शक असणे आवश्यक आहे.

पोलीस प्रेझेन्स वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च नंतर प्रभारी अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकाचौकांमध्ये पोलीस दिसले तर गुन्हेगारी, वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना चाप बसेल हा यामागील आयुक्तांचा हेतू आहे. वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळी रस्त्यावर थांबण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. विरुद्ध दिशेने प्रवास करणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, काळ्या काचा, बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरु आहे. प्रभारी अधिकारी चौकांमध्ये थांबल्याने या मोहिमांना वेग आला आहे.

Pune : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’चे व्याख्यान संपन्न

दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतो. त्यामुळे अशा एक हजार 944 दुचाकीस्वारांवर पोलीस (Pimpri) आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनात कोणताही बदल केल्यास त्या वाहनचालकाला एक हजार रुपये दंड केला जातो. सिग्नल सुटलेला नसताना वाहने पुढे नेल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सिग्नलच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सिग्नल तोडणाऱ्या नऊ हजार 433 जणांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

ऊन, वारा, पावसात सुरु असते नियमन

वाहतूक पोलीस ऊन, वारा, पावसात वाहतुकीचे नियमन करत असतात. सातत्याने रस्त्यावर थांबून वाहनांचा धूर, धूळ यामुळे त्यांना अनेक विकार जडण्याची शक्यता असते. त्यातच नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केल्यास अनेकदा वाहतूक पोलिसांना वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. राजकीय आणि प्रशासनातील बड्या लोकांच्या ओळखी काढून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.