Pimpri: महापालिकेचा निष्काळजीपणा अन् नागरिक, विक्रेते, पोलिसांना नाहक त्रास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज (बुधवारी) भाजी मंडईमध्ये गोंधळ उडाला. कोणताही विचार न करता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आजपासून भाजीमंडई सुरु करण्याचे फर्मान काढले. परंतु, काही तासांतच ते परिपत्रक मागे घेतले. मात्र, चार दिवसांपासून भाजीपाला मिळाला नसल्याने आज सकाळी पिंपरी भाजी मंडईत नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. महापालिकेच्या निष्काळजीपणाचा नागरिक, विक्रेत्यांसह पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने 14 एप्रिलपर्यंत सर्व भाजी मंडई, आठवडे बाजार बंद ठेवले होते. परंतु, लॉकडाऊनमध्ये वाढ झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी भाजी मंडई, आठवडे बाजार सुरु करण्याचे परिपत्रक काढले. परंतु, यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होणार नसल्याचे रात्री उशिरा त्यांच्या लक्षात आले. मग काय नेहमीच्या सवयीप्रमाणे आयुक्तांनी काही तासातच परिपत्रक बदलले. यापुढे देखील भाजी मंडई, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे नव्याने फर्मान त्यांनी काढले.

या नवीन आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे परिपत्रक काढले. त्यामध्ये जीवनावश्‍यक वस्तू भाजी, फळे किराना विक्री सुरू राहणार असल्याचे या म्हटले होते. त्यामुळे आज सकाळी पहाटेपासून नागरिकांनी मोठ्या संख्येने भाजी घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंडईत अवघे दोनच पोलीस कर्मचारी होते. मात्र, त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांची आणखी कुमक मागविली. सौम्य लाठीमार करुन नागरिकांना पांगविण्यात आले. राज्य राखीव दलाच्या जवानांही पाचारण करण्यात आले.

 

महापालिकेने गोंधळ होऊ नये याची खबरदारी घ्यावी

 प्रशासनाच्या विविध विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रतिबंधाबाबत आदेश काढण्यात आले असतील तर त्या सूचना संबंधितांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. अन्यथा विसंवाद निर्माण होतो. पोलिसांना मंडई बुधवारी सकाळी 11 ते दुपारी चारच्या दरम्यान सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलीस मंडईमध्ये सकाळी 9 वाजता बंदोबस्त लावणार होते. पण अचानक मंडई बंदचे आदेश काढले. दरम्यान, बुधवारी पहाटेच मंडई सुरू झाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मंडईच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यांनी हा गोंधळ होऊ न देण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. कोरोनाचा संसर्ग टाळणे हा प्राथमिक उद्देश आहे. त्यानुसार सर्वजण काळजी घेत आहोत.  स्मिता पाटील : पोलीस उपायुक्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.